Ravi Shastri On Team India: "जडेजा नाही, टॅलेंट नाही, असे कसे जिंकणार सामने?, माजी प्रशिक्षक रवी शास्त्री संतापले

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये टी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. कागांरूच्या संघाने मालिकेतील पहिल्याच सामन्यात शानदार कामगिरी करून विजयी सलामी दिली आहे.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाची सुरूवात निराशाजनक झाली. मालिकेतील पहिल्याच सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला. मंगळवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करून 208 एवढ्या धावा केल्या होत्या. तरीदेखील खराब गोलंदाजीमुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला.

मोहालीच्या मैदानावर सलामीवीर लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी शानदार फलंदाजी केली. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली स्वस्तात परतल्यानंतर लोकेश राहुलने डाव सावरला. अखेरच्या काही षटकांमध्ये पांड्या आणि सूर्या यांनी आक्रमक खेळी करून धावा 200 पार नेल्या. मात्र ऑस्ट्रेलियाच्या कॅमरून ग्रीनने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर कांगारूच्या संघाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.

या सामन्यात खराब फिल्डिंगमुळे भारतीय संघाला मोठा झटका बसला. विशेष बाब म्हणजे सामन्यात भारतीय खेळाडूंकडून एकूण 3 झेल सुटले. यामध्ये सामनावीर कॅमरून ग्रीनच्या झेलचा देखील समावेश होता. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार (52) आणि हर्षल पटेल (49) यांच्या 8 षटकांत ऑस्ट्रेलियाने 101 धावा केल्या.

भारताच्या खराब फिल्डिंगमुळे संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री चांगलेच भडकले. त्यांनी म्हटले की, संघात कोणताच प्रतिभावान फिल्डर नाही. रवींद्र जडेजा संघाचा हिस्सा नाही आहे. त्यामुळे सध्या कोणताच प्रतिभावान खेळाडू दिसत नाही, अशा स्थितीत कसे सामने जिंकायचे. अशा शब्दांत शास्त्रींनी फिल्डिंगवरून खेळाडूंना फटकारले.

"फिल्डिंगच्या बाबतीत सध्याचा संघ भारताच्या मागील 5-6 वर्षांच्या संघाच्या आसपास देखील नाही. मोठ्या स्पर्धेत यामुळे मोठा फटका बसेल. त्यामुळे संघाला फलंदाजी करताना 15-20 धावा अतिरिक्त करणं गरजेचे आहे. कारण मैदानात बघितले तर प्रतिभा कुठे आहे? रवींद्र जडेजा नाही. संघात कोणताच एक्स फॅक्टर नाही आहे", असे शास्त्रींनी अधिक म्हटले.

संघाची फिल्डिंग पाहून मी खूप निराश असल्याचे शास्त्रींनी म्हटले. म्हणजेच भारतीय संघाची कालची फिल्डिंग फारच वाईट होती. फिल्डिंगचा विचार केला तर मोठ्या स्पर्धांमध्ये बलाढ्य संघांना पराभूत करण्यासाठी ती महत्त्वाची भूमिका पार पाडते, असेही त्यांनी म्हटले.

या सामन्यात भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 208 धावा केल्या होत्या. हार्दिक पांड्याने 30 चेंडूत 71 धावांची ताबडतोब खेळी केली. पांड्याने त्याच्या खेळीत एकूण 5 षटकार आणि 7 चौकार लगावले. तर लोकेश राहुलने 35 चेंडूत 55 धावा केल्या.

209 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाने 19.2 षटकांत 6 बळी गमावून 211 धावा केल्या आणि विजय मिळवला. या मोठ्या विजयासह कांगारूच्या संघाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. अष्टपैलू कॅमरून ग्रीनने 30 चेंडूत 61 धावांची निर्णायक खेळी केली. तर अखेरच्या षटकांमध्ये मॅथ्यू वेडने नाबाद 45 धावा करून ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.