IND vs AUS, Test Series : टीम इंडिया मालिका कशी जिंकणार? सहा मॅच विनर खेळाडूंना बसवलं संघाबाहेर

IND vs AUS, Test Series : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातली बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठीच्या मालिकेला ९ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. दोन्ही संघ सज्ज झाले आहेत आणि आज झालेल्या पत्रकार परिषदेतून त्यांनी एकमेकांना आव्हान दिलं आहे. मागील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिका विजयातील भारताचे ६ स्टार खेळाडू यंदाच्या मालिकेचा भाग नाहीत.

रिषभ पंत - डिसेंबर २०२२मध्ये रिषभ पंतचा अपघात झाला आणि त्याला आता बराच काळ क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. रिषभ पंतने २०२०-२१च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. त्याने पाच डावांत ६८.५०च्या सरासरीने २७५ धावा केल्या होत्या. गॅबा कसोटीतील ऐतिहासिक विजयात रिषभने ३२८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नाबाद ८९ धावा चोपल्या होत्या.

अजिंक्य रहाणे - पहिल्या कसोटीत सर्वबाद ३६ अशा नामुष्कीनंतर विराट कोहली सुट्टीवर गेला अन् अजिंक्यने उर्वरित सामन्यांत भारताचे नेतृत्व सक्षमपणे सांभाळले. मेलबर्न कसोटीत अजिंक्यने शतकी खेळी केली आणि त्यानंतर भारताच्या सर्वच खेळाडूंना प्रेरणा मिळाली आणि पुढे इतिहास घडला.

जसप्रीत बुमराह - जसप्रीत बुमराहला दुखापतीमुळे यंदाच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठीच्या संघात स्थान दिले गेलेले नाही. मागील कसोटी मालिकेत त्याने ३ सामने खेळताना ११ विकेट्स घेतल्या होत्या.

हनुमा विहारी - हॅमस्ट्रींग दुखापत असूनही हनुमा विहारी मागील कसोटी मालिकेत तिसऱ्या सामन्यात खेळपट्टीवर ठाण मांडून बसला होता. विहारी व आर अश्विन या दोघांनी ४२.४ षटकं खेळून काढताना ती लढत अनिर्णीत राखली होती. विहारीने १६१ चेंडूंत नाबाद २३ धावा केल्या होत्या, तर अश्विननेही १२८ चेंडूंत नाबाद ३९ धावा केलेल्या.

वॉशिंग्टन सुंदर - मागील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत वॉशिंग्टन सुंदर एकच कसोटी सामना खेळला. गॅबा कसोटीत त्याने पहिल्या डावात ३ विकेट्स घेतल्या आणि अर्धशतक झळकावले. दुसऱ्या डावात त्याने डेव्हिड वॉर्नरची विकेट मिळवून दिली आणि त्यानंतर २२ धावाही केल्या.

शार्दूल ठाकूर - शार्दूल हाही गॅबा कसोटीचा सदस्य होता आणि त्याने त्या कसोटीत सात विकेट्स घेतल्या होत्या. ३६९ धावांच्या प्रत्युत्तरात भारताची अवस्था ६ बाद १८६ अशी झाली असताना शार्दूल व वॉशिंग्टन यांनी १२३ धावांची भागीदारी केली होती.