यंदाचा विश्वचषक भारताचाच? २०११ ला घडले तसेच घडतेय! १२ वर्षांनी जुळून आलेत ९ अजब योगायोग

WC Final 2023 Ind Vs Aus: २०११ आणि २०२३ या दोन्ही विश्वचषकात अनेक गोष्टींची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. या योगायोगांमुळे भारताचा विजय जवळपास निश्चित असल्याचा दावा केला जात आहे.

WC Final 2023 Ind Vs Aus: रविवारी, १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर आयसीसी विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत आहे. यंदाचा विश्वचषक भारत जिंकू शकतो, असा विश्वास अनेकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारत तिसऱ्यांना विश्वचषक जेतेपदावर नाव कोरण्यास उत्सुक आहे.

या विश्वचषकात भारताने सर्व सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने खराब सुरुवातीनंतर चांगले कमबॅक करत, अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. दोन्ही संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीसह भारतीय खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. एकंदरीत पार्श्वभूमीवर अंतिम सामन्यात टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर वरचष्मा राहील, असे सांगितले जात आहे.

भारतीय संघाने शेवटचा क्रिकेट विश्वचषक २०११ मध्ये जिंकला होता. त्यानंतर २०१५ आणि २०१९ क्रिकेट विश्वचषकात टीम इंडियाला उपांत्य फेरीच्या पलीकडे जाता आले नाही. यंदा २०२३ मध्ये टीम इंडिया नक्कीच जेतेपदाला गवसणी घालेल, अशी अपेक्षा चाहत्यांना आहे. क्रिकेट जाणकारांच्या मते, १२ वर्षांनंतर ९ अजब-गजब योगायोग जुळून येत आहेत, ज्यामुळे भारताचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

२०११ च्या क्रिकेट विश्वचषकात स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाच भारतीय गोलंदाज – झहीर खान, आशिष नेहरा, मुनाफ पटेल, हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. २०२३ विश्वचषकातही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा या पाच भारतीय गोलंदाजांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

२०११ च्या क्रिकेट विश्वचषकात न्यूझीलँडचा खेळाडू रॉस टेलरने त्याच्या वाढदिनी पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले होते. २०२३ या विश्वचषकात ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मिचेल मार्शने त्याच्या वाढदिवशी पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले.

२०११ च्या क्रिकेट विश्वचषकात डावखुरा फिरकी गोलंदाज युवराज सिंगने आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात पाच विकेट घेतल्या होत्या. २०२३ च्या या विश्वचषक स्पर्धेत डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध असाच पराक्रम केला.

२०१० मध्ये इंग्लंड संघ हा टी-२० विश्वचषक चॅम्पियन बनला होता. त्यानंतर २०११ मध्ये इग्लंडचा संघ क्रिकेट विश्वचषक खेळण्यासाठी भारतात आला होता. यावेळेसह या गोष्टीची पुनरावृत्ती झाली. २०२२ मध्ये इंग्लंडने टी-२० विश्वचषक जिंकला. त्यानंतर २०२३ ला आयसीसी विश्वचषकासाठी इंग्लंडचा संघ भारतात आला आहे. विशेष म्हणजे २०११ आणि २०२३ या दोन्ही विश्वचषकांमध्ये इंग्लंडचा संघ उपांत्य फेरी गाठू शकला नव्हता.

२०११ च्या विश्वचषक स्पर्धेत आयर्लंडने इंग्लंडने दिलेले ३२८ धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या पूर्ण करत अविश्वसनीय कामगिरी करून दाखवली होती. विश्वचषकाच्या इतिहासातील हा विक्रमी पाठलाग ठरला होता. २०२३च्या विश्वचषकात पाकिस्तानने श्रीलंकेने दिलेले ३४५ धावांचे लक्ष्य यशस्वीपणे गाठले. हे विश्वचषकाच्या इतिहासातील विक्रमी रन चेस ठरले.

२०११ च्या क्रिकेट विश्वचषकात विराट कोहलीने बांगलादेशविरुद्ध शतक झळकावले होते. २०२३ च्या या विश्वचषकातही विराट कोहलीने बांगलादेशविरुद्ध शतक झळकावले.

२०११ मध्ये विश्वचषकात भारताने शेवटचा साखळी सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात युवराज सिंगने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक झळकावले आणि तो ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला. २०२३ विश्वचषकात नेदरलँड्सविरुद्धच्या भारताच्या शेवटच्या साखळी सामन्यात श्रेयस अय्यरने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत शतक झळकावले आणि तो ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला.

२०११ च्या क्रिकेट विश्वचषकात आयर्लंडच्या केविन ओब्रायनने ५० चेंडूत सर्वात जलद शतक केले होते. २०२३ च्या या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू एडन मार्करमने ४९ चेंडूत शतक झळकावून ओब्रायनचा विक्रम मोडला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने ४० चेंडूत शतक झळकावून मार्करमला मागे टाकले.

२०११ च्या क्रिकेट विश्वचषकात यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीने श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात नाबाद ९१ धावा करून भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. २०२३ या विश्वचषकात यष्टीरक्षक केएल राहुलनेही पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत ९० हून अधिक धावांची खेळी केली आहे. राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद ९७ धावा केल्या होत्या.