धोनीचं शीर कापलेलं पोस्टर ते भारतीय खेळाडूंचं मुंडण; भारताविरुद्ध बांगलादेशींचा राग, ५ वादग्रस्त घटना

ICC ODI World Cup 2023 India vs Bangladesh Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत आज भारत आणि बांगलादेश यांच्यात पुण्यात सामना होतोय आणि बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातल्या क्रिकेट सामन्यांना जसा वादग्रस्त इतिहास आहे, तसेच वाद भारत-बांगलादेश क्रिकेट सामन्यांतही झालेले आहेत.

२०१६चा आशिया चषक बांगलादेशमध्ये खेळला गेला होता. ज्यामध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात अंतिम सामना होणार होता. या सामन्यापूर्वी बांगलादेशी चाहत्यांनी बनवलेले एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यामध्ये महेंद्रसिंग धोनीचे कापलेले डोके बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्किन अहमदच्या हातात दिसत होते. या पोस्टरमुळे बराच गदारोळ झाला.

आशिया चषक २०१६च्या घटनेपूर्वी २०१५ मध्ये देखील या घटनेने मोठा गदारोळ झाला होता. २०१५ मध्ये भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर गेला होता. त्यानंतर मुस्तफिजुर रहमानने पदार्पण केले आणि दोन सामन्यांत ११ बळी घेतले. यानंतर एका बांगलादेशी वृत्तपत्राने एक अतिशय वादग्रस्त फोटो प्रसिद्ध केला होता. ज्यामध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंचे अर्धे केस कापलेले दिसले. तर मुस्तफिजुर रहमानच्या हातात वस्तरा दिसला होता.

२०२० मध्ये १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि बांगलादेशच्या ज्युनियर संघामध्ये खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशने विजेतेपद पटकावल्यानंतर बांगलादेशच्या ज्युनियर खेळाडूंनी टीम इंडियाच्या ज्युनियर खेळाडूंना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वातावरण इतकं तापलं की दोन्ही संघांचे खेळाडू मैदानात समोरासमोर यष्टी आणि बॅट घेऊन एकमेकांना भिडले.

२००८ च्या १९ वर्षांखालील स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने विजय मिळवला होता. त्यावेळी बांगलादेशचा रुबेल हुसेनही आपल्या देशाच्या संघाकडून १९ वर्षांखालील संघात खेळत होता. या स्पर्धेत कोहली आणि रुबेल यांच्यात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. तोच संघर्ष पुन्हा एकदा समोर आला, जेव्हा विराट कोहली आणि रुबेल हुसैन २०११ मध्ये वर्ल्ड कप पदार्पण करण्यासाठी मैदानात उतरले होते.

मीरपूरमध्ये खेळल्या गेलेल्या ग्रुप स्टेज मॅचमध्ये रुबेलने कोहलीच्या दिशेने बॉल फेकण्याचा इशारा केला. यानंतर दोघांमध्ये वादावादी झाली आणि दोघांनी एकमेकांना काही अपशब्दही उच्चारले, मात्र त्यानंतर हे प्रकरण शांत झाले. २०१५ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत जेव्हा हे दोन्ही खेळाडू पुन्हा आमनेसामने आले, तेव्हा रुबेलने कोहलीला तीन धावांवर बाद केले. यानंतर रुबेलने त्याच्यासमोर जोरदार वादग्रस्त आनंद साजरा केला.