एकही ओव्हर नाही मेडन; टेस्टमध्ये बेस्ट 'रन रेट'सह टीम इंडियानं सेट केला नवा विश्व विक्रम

बांगलादेश विरुद्धच्या कानपूर कसोटी सामन्यात टीम इंडियाने अनेक विक्रम प्रस्थापित केले. त्यापैकी एक विक्रम सर्वाधिक सरासरीनं धावा कुटण्याचा आहे.

पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित राहण्याकडे झुकलेला सामना निकाली लावण्यासाठी रोहित अँण्ड कंपनीने टी स्टाईलमध्ये बॅटिंग करत चाहत्यांच्या डोळ्याचे पारणं फेडले. याच धमाकेदार अंदाजाच्या जोरावर टीम इंडियाने बांगलादेश विरुद्धच्या सामन्याला कलाटणी देत दिमाखदार विजय नोंदवला.

तुफान फटेकेबाजी करताना भारतीय संघाने अनेक विक्रमांची नोंद केली. ज्यात संघाचे सर्वात जलद अर्धशतक, शतक आणि द्विशतक याचा सामावेश होता.

या सोबतच टीम इंडिया कसोटीत सर्वाधिक रन रेटसह धावा करणारी टीम ठरली आहे. बांगलादेशच्या संघाची धुलाई करताना टीम इंडियातील फलंदाजांनी एकही मेडन ओव्हर खेळली नाही. हा देखील एक रेकॉर्डच आहे.

भारताकडून युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने दोन्ही डावात अर्धशतकी खेळी केल्याचे पाहायला मिळाले.

यशस्वी शिवाय लोकेश राहुलनंही उत्तम १५८.१४ च्या स्ट्राईक रेटनं ४३ चेंडूत ६८ धावांची दमदार खेळी केली.

भारतीय संघाने दोन्ही डावात मिळून ७.३६ च्या सरासरीने धावा काढल्या. यासह टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा रेकॉर्ड मोडीत काढत नवा वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला.

दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २००५ मध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या केपटाऊन कसोटी सामन्यात ६.८० च्या सरासरीनं बॅटिंग केली होती.

कसोटी सामन्यात सर्वात जलद रन रेटनं धावा काढणाऱ्या संघांच्या यादीत तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर इंग्लंडचा संघ आहे. त्यांनी अनुक्रमे ६.७३, ६.३४ आणि ५.७३ च्या सरासरीने धावा काढल्याचे पाहायला मिळाले आहे.