IND vs BAN: "जेव्हाही आम्ही भारतासोबत खेळतो तेव्हा आमच्यासोबत असे घडते", शाकिब अल हसनने व्यक्त केली नाराजी

टी-20 विश्वचषकात आज भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना पार पडला. भारतीय संघाने विजय मिळवून उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे.

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने बांगलादेशचा पराभव करून तिसरा विजय नोंदवला आणि उपांत्य फेरीतील आपली जागा निश्चित केली. भारताने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि लोकेश राहुल यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 6 गडी गमावत 184 धावा केल्या. पावसाचा व्यत्यय आल्याने बांगलादेशला 16 षटकांत 151 धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते. बांगलादेशचा संघ 6 गडी गमावून केवळ 145 धावाच करू शकला.

भारतीय संघाने विजय मिळवल्यानंतर बांगलादेशच्या संघाचा कर्णधार शाकिब अल हसनने मोठे वक्तव्य केल. जेव्हाही आम्ही भारताविरुद्ध खेळतो तेव्हा आमच्यासोबत असे घडते, अशा शब्दांत शाकिबने नाराजी व्यक्त केली. खरं तर अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने बाजी मारली. मात्र बांगलादेशच्या संघाने देखील झुंज दिली. अखेरच्या षटकात 20 धावांची आवश्यकता होती. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बांगलादेशच्या फलंदाजाने षटकार मारला मात्र बाकी चेंडूवर अर्शदीप सिंगने पकड मजबूत केली आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

भारतीय संघाने निसटता विजय मिळवल्यानंतर बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने नाराजी व्यक्त केली. "जेव्हाही आम्ही भारतासोबत खेळतो तेव्हा आमच्यासोबतही असेच घडते. आम्ही हा सामना जिंकण्याच्या जवळपास आलो होतो पण विजयाची सीमारेषा ओलांडू शकलो नाही. दोन्ही संघांनी या सामन्याचा पुरेपूर आनंद लुटला, हा एक अप्रतिम सामना होता आणि आपल्या सर्वांना देखील तेच हवे आहे. शेवटी एका संघाला सामना जिंकावा लागतो आणि एकाला पराभव स्वीकारावा लागतो." अर्थात भारताविरूद्धचा सामना नेहमी अटीतटीचा होतो पण आम्हाला विजय मिळत नाही असे शाकिबने म्हटले.

बांगलादेशकडून सलामीवीर लिटन दासने शानदार अर्धशतकी खेळी केली. त्याने 27 चेंडूत 60 धावांची ताबडतोब खेळी करून बांगलादेशची सुरूवात शानदार केली. दासच्या या खेळीमुळे भारतीय गोलंदाजांवर दबाव वाढत चालला होता. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबवावा लागला अखेर सामना सुरू होताच भारतीय गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन केले. आक्रमक वाटणाऱ्या दासला लोकेश राहुलने धावबाद करून तंबूत पाठवले.

"लिटन दास आमच्या संघातील सर्वोत्तम फलंदाज आहे. पॉवरप्ले दरम्यान त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्यामुळे बांगलादेशच्या धावसंख्येला गती मिळाली आणि त्याने संघाला खात्री दिली की आपण आव्हानाचा पाठलाग करू शकतो. कारण तो चौकार आणि षटकार मारत होता." अशा शब्दांत बांगलादेशच्या कर्णधाराने लिटन दासचे कौतुक केले.

शाकिबने भारतीय संघाच्या फलंदाजीबद्दल म्हटले, "तुम्ही भारताचे पहिले चार फलंदाज पाहिले तर ते खूप आक्रमक आहेत. चौघांना बाद करण्याची आमची योजना होती आणि त्यामुळेच तस्किनला सतत गोलंदाजी दिली जात होती. दुर्दैवाने तो बळी घेण्यात अपयशी ठरला पण त्याने जास्त धावा दिल्या नाहीत. आम्ही खूप निश्चित आहोत आणि या विश्वचषकातील आमच्या आधीच्या सामन्यांबद्दल जास्त भाष्य करत नाही, आमचा अजून एक सामना शिल्लक आहे आणि त्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे."