आर अश्विनच्या 'फिरकी'ची जादू चालणार; विशाखापट्टणम येथे ५ मोठे विक्रम नोंदवणार

IND vs ENG 2nd Test : भारत-इंग्लंड यांच्यातली दुसरी कसोटी उद्यापासून विशाखापट्टणम येथे सुरू होत आहे. इंग्लंडने पहिल्या कसोटीत २८ धावांनी भारताला पराभूत करून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघ पुनरागमनासाठी जोरदार प्रयत्न करतील हे निश्चित आहे. या कसोटीत भारताचा स्टार फिरकीपटू आर अश्विन याला पाच विक्रम मोडण्याची संधी आहे

इंग्लंडविरुद्ध २० कसोटी सामन्यांत आर अश्विनने ९३ विकेट्स घेतल्या आहेत आणि त्याने दुसऱ्या कसोटीत ३ विकेट्स घेताच मोठा विक्रम होईल. इंग्लंडविरुद्ध कसोटीत सर्वाधिक ९५ विकेट्स ( २३ सामने) घेण्याच्या भागवत चंद्रशेखर यांचा विक्रम अश्विन मोडेल. इंग्लंडविरुद्ध कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीयाचा मान त्याला मिळेल.

आर अश्विनने आतापर्यंत ९६ कसोटीत ४९६ विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीत ५०० विकेट घेणाऱ्या दुसऱ्या भारतीयाचा मान पटकावण्यासाठी त्याला ४ बळी घ्यावे लागणार आहेत. पण, जर त्याने विशाखापट्टणम येथे हा पराक्रम केल्यास तो भारताकडून सर्वात जलद ५०० विकेट्स घेणारा गोलंदाज ठरले आणि जगात तो या विक्रमात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल.

अश्विनने दुसऱ्या कसोटीत सात विकेट्स घेण्यात यश मिळवले तर तो इंग्लंडविरुद्ध विकेट्सचे शतक पूर्ण करेल आणि असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय आणि जगातील दुसरा गोलंदाज ठरले. भारत-इंग्लंड कसोटीत जेम्स अँडरसनने सर्वाधिक १३९ विकेट्स घेतल्या आहेत.

आर अश्विनने भारतीय खेळपट्टींवर ५६ कसोटी सामन्यांत ३४३ विकेट्स घेतल्या आहेत. भारतीय खेळपट्टीवंर सर्वाधिक कसोटी विकेट्सचा अनिल कुंबळे ( ३५०) याचा विक्रम मोडण्यासाठी अश्विनला दुसऱ्या कसोटीत ८ विकेट्सची गरज आहे.

आर अश्विनने ९६ कसोटी सामन्यांत आतापर्यंत ३४ वेळा डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. जर दुसऱ्या कसोटीच्या दोन्ही डावांत तो पाच विकेट्स घेण्यात यशस्वी झाल्यास, अनिल कुंबळे याचा सर्वाधिक ३५ वेळा असा पराक्रम करण्याचा विक्रम अश्विन मोडू शकतो.