यशस्वी जैस्वालने ६० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; विनोद कांबळी, अझरुद्दीन, रोहित यांना टाकले मागे

IND vs ENG 2nd Test Live Scorecard : भारत-इंग्लंड यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीचा पहिला यशस्वी जैस्वालने गाजवला. त्याच्या नाबाद १७९ धावांच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेर ६ बाद ३३६ धावांचा डोंगर उभा केला. यशस्वीने आजच्या खेळीने अनेक विक्रम मोडले.

रोहित शर्मा ( १४ ) व शुबमन गिल ( ३४ ) हे बाद झाल्यानंतर जैस्वालने तिसऱ्या विकेटसाठी श्रेयस अय्यरसह ( २७) १३१ चेंडूंत ९० धावांची भागीदारी केली. त्यानंतर यशस्वी व पदार्पणवीर रजत पाटीदार यांनी १२४ चेंडूंत ७० धावांची भागीदारी केली. रजतने ७२ चेंडूंत ३२ धावांची संयमी खेळी केली. अक्षर पटेलसह ( २७) त्याने पाचव्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली.

भारतीय खेळपट्टीवर कसोटीत १५० धावा करणारा तो ( २२ वर्ष व ३६ दिवस) तिसरा युवा फलंदाज ठरला. सचिन तेंडुलकरने १९९३ मध्ये इंग्लंडविरुद्ध १९ वर्ष व २९३ दिवसांचा असताना आणि विनोद कांबळीने १९९३ मध्ये इंग्लंडविरुद्धच २१ वर्ष व ३२ दिवसांचा असताना असा पराक्रम केला होता.

२२ किंवा त्याहून कमी वयात सलामीवीर म्हणून दोनवेळा १५०+ धावा करण्याच्या ख्रिस गेलच्या विक्रमाशी आज यशस्वीने बरोबरी केली. यशस्वीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० धावांचा टप्पा ओलांडला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २०२३-२५ मध्ये ५०० धावा करणारा तो पहिला भारतीय आणि पहिला आशियाई फलंदाज ठरला.

विशाखापट्टणम कसोटीत सर्वोत्तम वैयक्तिक खेळीच्या विक्रमात यशस्वीने आज दुसऱ्या स्थानी झेप घेताना रोहित शर्मा ( १७६ वि. दक्षिण आफ्रिका, २०१९) याला मागे टाकले. यशस्वीला उद्या मयांक अग्रवालचा २१५ धावांचा ( वि. दक्षिण आफ्रिका, २०१९) विक्रम खुणावतोय.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजाने केलेली ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. यशस्वीने आज नाबाद १७९ धावा करून १९६४ साली बुधी कुंदरन ( चेन्नई) यांचा विक्रम मोडला. कसोटीच्या एका दिवशी भारताच्या डावखुऱ्या फलंदाजाने केलेली ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. शिखर धवन ( १९० वि. श्रीलंका, २०१७ आणि १८५ वि. ऑस्ट्रेलिया, २०१३) हा आघाडीवर आहे.

मागील १५ वर्षांत भारताच्या एकाही डावखुऱ्या फलंदाजाला कसोटीत द्विशतक झळकावता आलेले नाही. २००८ मध्ये गौतम गंभीरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०६ धावा केल्या होत्या. त्यापूर्वी विनोद कांबळी ( दोनवेळा) व सौरव गांगुली यांनी द्विशतक झळकावले होते.

इंग्लंडविरुद्ध कसोटीच्या एका दिवशी नाबाद १७९ धावा करून यशस्वीने महान फलंदाज सुनील गावस्कर यांच्या ( १७९ धावा, ओव्हल, १९७९) विक्रमाशी बरोबरी केली. तर मोहम्मद अझरुद्दीन ( १७५, मँचेस्टर, १९९०) याला मागे टाकले.