IND vs ENG: शतकामुळे शुबमन वाचला, अन्यथा....! त्यानेच सांगितली संघातील इनसाईड स्टोरी

IND vs ENG 2nd Test Match: शुबमनने १४७ चेंडूत १०४ धावांची शतकी खेळी करून पुनरागमन केले.

भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या विशाखापट्टणम येथे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. हा सामना म्हणजे भारताचा आघाडीचा फलंदाज शुबमन गिलसाठी जणू काही अग्निपरीक्षाच.

मागील मोठ्या कालावधीपासून धावांसाठी संघर्ष करत असलेल्या गिलला चालू सामन्याच्या पहिल्या डावात काही खास करता आले नाही. पण दुसऱ्या डावात शतक झळकावून टीकाकारांना उत्तर देण्यात गिलला यश आले.

दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात गिलने ४६ चेंडूत ३४ धावांची छोटी खेळी केली. पण, यशस्वी जैस्वालच्या द्विशतकामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली.

दुसऱ्या डावात टीम इंडिया अडचणीत असताना शुबमनने १४७ चेंडूत १०४ धावांची शतकी खेळी करून पुनरागमन केले. याशिवाय भारतीय संघातील आपली जागा मजबूत केली. कारण सततच्या फ्लॉप शोमुळे तो संघाबाहेर होण्याच्या स्थितीत होता.

सध्या सुरू असलेला दुसरा कसोटी सामना ही गिलसाठी शेवटची संधी होती. पण इथे शतकी खेळी करून गिलने संघातील आपले स्थान कायम ठेवले.

'इंडियन एक्सप्रेस'ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, गिलसाठी ही शेवटची संधी होती. या सामन्यात जर त्याने चांगली कामगिरी केली नसती तर तो देशांतर्गत क्रिकेटकडे वळणार होता.

भारतीय संघ व्यवस्थापनाने गिलला स्पष्ट संदेश दिला होता की विशाखापट्टणम कसोटी ही त्याच्यासाठी शेवटची संधी असू शकते, कारण त्याला तिसऱ्या क्रमांकावर अनेकदा संधी मिळाली असून तो सातत्याने अपयशी ठरला आहे.

दरम्यान, गिलने त्याच्या घरच्यांना देखील याबाबत माहिती दिली होती. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पुढील सामन्यात नव्या चेहऱ्यांना भारतीय संघात स्थान मिळू शकते. बीसीसीआयने अद्याप उर्वरीत तीन सामन्यांसाठी संघ जाहीर केला नाही.

खरं तर शुबमन गिलने रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्याची तयारी केली होती. तो मोहालीमध्ये गुजरातविरुद्ध होणाऱ्या पुढील सामन्यानंतर कदाचित रणजी ट्रॉफी खेळायला जाईल, असे त्याने सांगितले होते. मात्र, विशाखापट्टणम कसोटीत दुसऱ्या डावात टीम इंडियासाठी महत्त्वपूर्ण शतक झळकावून गिलने संघातील स्थान मजबूत केले.

गिल मागील काही कालावधीपासून धावांसाठी संघर्ष करत आहे. त्याने मागील तीन डावात अनुक्रमे २३, ० आणि ३४ धावा केल्या आहेत. तसेच १० डावांमध्ये त्याने केवळ १५० धावा केल्या आहेत.