India vs England, 2nd Test : आर अश्विन 'जगात भारी'; भारतीय गोलंदाजाच्या नावावर ऐतिहासिक विक्रम

इंग्लंडचा पहिला डाव १३४ धावांत गुंडाळून टीम इंडियानं पहिल्या डावात १९५ धावांची मजबूत आघाडी घेतली आहे. आर अश्विननं ४३ धावांत ५ विकेट्स घेतल्या. ( R Ashwin 200 left handers wickets)

India vs England, 2nd Test Day 2 : भारतीय संघानं दुसऱ्या कसोटीत दमदार कामगिरी करून दाखवली. पहिल्या डावात ३२९ धावा केल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना कोंडीत पकडले. आर अश्विन ( R Ashwin) आणि अक्षर पटेल ( Axar Patel) यांनी मिळून इंग्लंडला धक्के दिले.

पहिल्या कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियानं केलेल्या कमबॅकचं सर्वांकडून कौतुक होत आहे. या सामन्यात प्रेक्षक स्टेडियमवर परतल्यानं टीम इंडियाच्या १२व्या खेळाडूची जबाबदारी ते सक्षमपणे पार पाडत आहेत. इंग्लंडचा पहिला डाव १३४ धावांत गुंडाळून टीम इंडियानं पहिल्या डावात १९५ धावांची मजबूत आघाडी घेतली आहे. आर अश्विननं ४३ धावांत ५ विकेट्स घेतल्या.

बेन स्टोक्सचा ( १८) त्रिफळा उडवून आर अश्विननं विक्रमाला गवसणी घातली. बेन स्टोक्सला सर्वाधिक ९वेळ बाद करण्याचा विक्रम अश्विननं नावावर केला. या विकेटसह आर अश्विननं ३५०वी आंतरराष्ट्रीय बळी टिपण्याचा विक्रम केला. अनिल कुंबळे ( ४७६) आणि हरभजन सिंग ( ३७६) यांच्यानंतर हा पराक्रम करणारा अश्विन हा तिसरा भारतीय गोलंदाज आहे.

जानेवारी २०१५नंतर कसोटीत सर्वाधिक २७५ विकेट्सही अश्विनच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाचा नॅथन लियॉन २६५ विकेट्ससह दुसऱ्या आणि इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड २५३ विकेट्ससह तिसऱ्या स्थानी आहे.

भारतात सर्वाधिक कसोटी विकेट्सच्या विक्रमात आर अश्विननं फिरकीपटू हरभजन सिंगला मागे टाकले. अनिल कुंबळे ३५० विकेट्ससह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर अश्विन ( २६६), हरभजन ( २६५), कपिल देव ( २१९) आणि रवींद्र जडेजा ( १५७) यांचा क्रमांक येतो.

२०१५नंतर आर अश्विननं सर्वाधिक २० वेळा कसोटी क्रिकेटच्या एका डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.एकूण त्यानं २९ वेळा हा पराक्रम केला आहे.

भारताविरुद्धची इंग्लंडची ही दुसरी निचांक कामगिरी आहे. यापूर्वी १९८१साली मुंबईतील कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव १०२ धावांवर गडगडला होता.

घरच्या मैदानावरील ४५ कसोटींमध्ये अश्विननं २३वेळा एका डावात पाच विकेट्स घेतल्या. त्यानं यासह जेम्स अँडरसनचा ( ८९ कसोटी व २२ वेळा पाच विकेट्स) विक्रम मोडला. या विक्रमात मुथय्या मुरलीधरन ( ४५), रंगना हेराथ ( २६) आणि अनिल कुंबळे ( २५) आघाडीवर आहेत.

स्टुअर्ट ब्रॉडला बाद करून अश्विननं इतिहास घडवला. कसोटी क्रिकेटमध्ये २०० डावखुऱ्या फलंदाजांना बाद करणारा तो जगातील पहिलाच गोलंदाज ठरला. या विक्रमात त्याच्यानंतर मुथय्या मुरलीधरन ( १९१), जेम्स अँडरसन ( १८६), ग्लेन मॅकग्राथ ( १७२) व शेन वॉर्न ( १७२) यांचा क्रमांक येतो.