Rohit Sharma, IND vs ENG 3rd ODI Live Update : ३९ वर्षांची प्रतीक्षा संपली, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची ऐतिहासिक भरारी, पाहा सर्व रेकॉर्ड्स एका क्लिकवर

India vs England 3rd ODI Live Update : रिषभ पंतच्या ( Rishabh Pant) नाबाद १२५ धावा आणि हार्दिक पांड्यासह ( Hardik Pandya) १३३ धावांच्या भागीदारीने भारतीय संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात इंग्लंडवर ५ विकेट्स राखून विजय मिळवला. हार्दिकने ४ विकेट्स व ७१ धावा अशी अष्टपैलू कामगिरी करून विजयात सिंहाचा वाटा उचलला. भारताने ४२.१ षटकांत ५ बाद २६१ धावा करून विजय मिळवताना मालिका २-१ अशी खिशात घातली अन् अनेक विक्रमांचा पाऊस पाडला.

India vs England 3rd ODI Live Update : रिषभ पंतच्या ( Rishabh Pant) नाबाद १२५ धावा आणि हार्दिक पांड्यासह ( Hardik Pandya) १३३ धावांच्या भागीदारीने भारतीय संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात इंग्लंडवर ५ विकेट्स राखून विजय मिळवला. हार्दिकने ४ विकेट्स व ७१ धावा अशी अष्टपैलू कामगिरी करून विजयात सिंहाचा वाटा उचलला. भारताने ४२.१ षटकांत ५ बाद २६१ धावा करून विजय मिळवताना मालिका २-१ अशी खिशात घातली अन् अनेक विक्रमांचा पाऊस पाडला.

रिसे टॉप्लीने पुन्हा एकदा टीम इंडियाला धक्के दिले. त्याने शिखर धवन ( १) , रोहित शर्मा ( १७) व विराट कोहली ( १७) या आघाडीच्या फलंदाजांना ३८ धावांवर माघारी पाठवले. रिषभ पंत व सूर्यकुमार यादव यांनी ३४ धावांची भागीदारी केली. त्यानंतर रिषभ व हार्दिक पांड्या सहजतेने धावा करताना दिसले. हार्दिक व रिषभ यांची ११५ चेंडूंवरील १३३ धावांची पाचव्या विकेट्सची भागीदारी ब्रेडन कार्सने संपुष्टात आणली. हार्दिक ५५ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने ७१ धावांवर बाद झाला.

एकाच वन डे सामन्यात ५०+ धावा व ४ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेणारा हार्दिक हा भारताचा पाचवा खेळाडू ठरला. यापूर्वी कृष्णमाचारी श्रीकांत ( वि. न्यूझीलंड, १९८८), सचिन तेंडुलकर ( वि. ऑस्ट्रेलिया, १९९८), सौरव गांगुली ( वि. श्रीलंका, १९९९ आणि वि. झिम्बाब्वे, २०००) व युवराज सिंग ( वि. इंग्लंड, २००८ आणि आयर्लंड, २०११) यांनी हा पराक्रम केला आहे.

रिषभने १०६ चेंडूंत शतक पूर्ण केले. शतक पूर्ण झाल्यानंतर रिषभने डेव्हिड विलीच्या षटकात ४,४,४,४,४,१ अशी फटकेबाजी केली आणि त्यानंतर पुढील षटकात चौकार खेचून भारताचा विजय पक्का केला. भारताने ४२.१ षटकांत ५ बाद २६१ धावा करून ५ विकेट्स राखून मालिका २-१ अशी खिशात घातली.

इंग्लंडमध्ये कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा रिषभ पंत हा पहिला आशियाई यष्टिरक्षक ठरला. वन डे क्रिकेटमध्ये आशिया खंडाबाहेर शतक झळकावणारा रिषभ पंत हा राहुल द्रविड व लोकेश राहुल यांच्यानंतर तिसरा यष्टिरक्षक ठरला. इंग्लंडमध्ये वन डे शतक झळकावणारा तो राहुल द्रविड ( १९९९) नंतर दुसरा भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ठरला.

वन डे क्रिकेटमध्ये भारतीय यष्टिरक्षकाची नाबाद १२५ ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. रिषभने लोकेश राहुलचा २०२०चा न्यूझीलंडविरुद्धचा ११२ धावांचा विक्रम मोडला. ११३ चेंडूंत नाबाद १२५ धावा करणाऱ्या रिषभला मॅन ऑफ दी मॅच म्हणून गौरविण्यात आले, तर हार्दिक पांड्या मॅन ऑफ दी सीरिज ठरला.

८ वर्षांनंतर भारताने इंग्लंडमध्ये वन डे मालिका जिंकली. १९९०मध्ये मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारताने २ ची वन डे मालिका २-० अशी जिंकली होती आणि त्यानंतर २०१४मध्ये महेंद्रसिंग धोनीने ३-१ अशा मालिकाविजयासह २४ वर्षांचा दुष्काळ संपवला होता. त्यानंतर इंग्लंडमध्ये मालिका विजयासाठी ८ वर्ष प्रतीक्षा करावी लागली.

१९८३च्या वर्ल्ड कपनंतर मँचेस्टर येथील भारताचा हा पहिलाच वन डे सामन्यातील विजय ठरला. ३९ वर्षांनंतर भारताने येथे वन डे मॅच जिंकली.

इंग्लंडमध्ये वन डे व ट्वेंटी-२० मालिका जिंकणारा रोहित शर्मा हा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला.रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने १६ पैकी १३ वन डे मालिका जिंकल्या आहेत. त्याचा हा सलग ७ वा मालिका विजय आहे.