Join us  

IND vs ENG 3rd Test LIVE: जो रूटनं लावली टीम इंडियाची वाट; कोणालाच न जमलेले केले अनेक पराक्रम!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 9:31 PM

Open in App
1 / 8

ind vs eng 3rd test live updates cricket match score : भारतीय फलंदाजांपाठोपाठ गोलंदाजांनाही लीड्स कसोटीत अपयश आलेले पाहायला मिळाले. इंग्लंडच्या आघाडीच्या चारही फलंदाजांनी ५०+ धावा करताना भारतीय गोलंदाजांना झोडपून काढले. कर्णधार जो रूटनं पुन्हा एकदा त्याच्या इंगा दाखवला. त्यानं आपला फॉर्म कायम राखताना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचं टेंशन वाढवण्याचं काम केलं. त्यानं पुन्हा एकदा टीम इंडियाचे धाबे दणाणून सोडले. जो रुटनं पुन्हा एकदा शतकी खेळी करून टीम इंडियासमोर मोठं आव्हान उभं केलं आहे.

2 / 8

इंग्लंडनं सलामीला उतरवलेली हसीब हमीद आणि रोरी बर्न्स ही नवी जोडी सुसाट खेळली. रोरी बर्न्स व हसीब हमीद यांची भागीदारी १३५ धावांवर संपुष्टात आली. रोरी बर्न्स १५३ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ६१ धावांवर त्रिफळाचीत झाला. हमीदनं १९५ चेंडूंत १२ चौकारांसह ६८ धावा केल्या.

3 / 8

कर्णधार जो रूट पुन्हा एकदा टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर अभेद्य भिंतीसारखा उभा राहिला. त्यानं डेवीड मलानसह इंग्लंडचा डाव सावरताना संघाची आघाडी आणखी मजबूत केली. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकांसह तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.

4 / 8

२०१२च्या कोलकाता कसोटीनंतर प्रथमच इंग्लंडच्या आघाडीच्या चार फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली आहे. मोहम्मद सिराजनं ही १३९ धावांची भागीदारी तोडली. डेविड मलान १२८ चेंडूंत ११ चौकारांसह ७० धावांवर माघारी परतला. या कॅलेंडर वर्षात रूटनं १३६६+ धावा केल्या आहेत आणि २०१५नंतर इंग्लंडच्या कर्णधारानं कॅलेंडर वर्षात केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. ( Most runs in a calendar year for an England captain). अॅलेस्टर कूकनं २०१५मध्ये १३६४ धावा केल्या होत्या.

5 / 8

जो रूटनं कसोटीतील २३वे शतक पूर्ण केले. यंदाच्या वर्षातील हे त्याचे सहावे, तर भारताविरुद्धचे चौथे शतक ठरले. विशेष म्हणजे रूटनं या मालिकेत तीन शतकं झळकावली. इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी शतकं झळकावणाऱ्या खेळाडूंमध्ये अॅलिस्टर कूकनंतर ( ३३) आता केव्हीन पिटरसनसह रूटचे नाव आहे. इयान बेल, जेफ्ररी बॉयकॉट, वॅली हमोंड व मिचेल कॉवड्रेय यांनी प्रत्येकी २२ शतकं झळकावली आहेत.

6 / 8

इंग्लंडचा कर्णधार म्हणून रुटनं १२वे शतक झळकावताना कूकच्या विक्रमाशी बरोबरी केली. ग्रॅहम गूच यांनी ११ व पीटर मे यांनी १० शतकं केली आहेत. कॅलेंडर वर्षात तीन वेळा १३५० हून अधिक धावा करणारा जो रूट हा जगातला पहिला फलंदाज ठरला.

7 / 8

शिवाय १००व्या कसोटी डावात शतक झळकावणारा तो जगातील पहिला फलंदाज आहे. या मालिकेत रूटचे हे तिसरे शतक आहे. सलग तीन शतकं दोन वेळा करणारा रूट हा पहिलाच फलंदाज. या मालिकेत त्यानं १०९, १८०* व १००+* अशी खेळी केली आहे. त्याआधी श्रीलंका दौऱ्यावर २२८ व १८६ आणि त्यानंतर चेन्नईत २१८ धावा चोपल्या होत्या.

8 / 8

कॅलेंडर वर्षात इंग्लंडकडून सहा शतकं पूर्ण करणारा रूट हा तिसरा फलंदाज ठरला. यापूर्वी १९४७मध्ये डेनिसी कॉम्प्टन व २००२मध्ये मायकल वॉन यांनी हा पराक्रम केला होता.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजो रूटविराट कोहली
Open in App