यशस्वी जैस्वालकडे ५३ वर्ष जुना विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी; 'इतक्या' धावांची गरज

Yashasvi Jaiswal: यशस्वीने तीन कसोटी सामन्यात ठोकली दोन द्विशतके

Yashasvi Jaiswal Sunil Gavaskar, IND vs ENG 4th Test: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत मुंबईकर सलामीवीर यशस्वी जैस्वाल अप्रतिम कामगिरी करत आहे. २२ वर्षीय यशस्वीने विशाखापट्टणम कसोटी सामन्यात २०९ धावांची इनिंग खेळली.

त्यानंतर राजकोट येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीतही या युवा फलंदाजाने भारताच्या दुसऱ्या डावात २१४ धावा कुटल्या. यशस्वी ज्याप्रकारे कामगिरी करत आहे, त्यावरून तो या मालिकेत एक मोठा विक्रम करण्याची शक्यता आहे.

महान फलंदाज सुनील गावस्कर यांचा ५३ वर्ष जुना विक्रम मोडण्याची यशस्वी जैस्वालला संधी आहे. एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम लिटल मास्टर सुनील गावसकरांच्या नावे आहे.

सुनील गावसकर यांनी १९७१ साली वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पणाच्या कसोटीत दमदार कामगिरी केली होती. ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्यांनी तब्बल ७७४ धावा कुटल्या होत्या. या मालिकेत त्यांनी एक द्विशतक, चार शतके आणि तीन अर्धशतके झळकावली होती.

यशस्वी जैस्वालने इंग्लंडमधील चालू कसोटी मालिकेत आतापर्यंत सहा डावांत १०९ च्या सरासरीने ५४५ धावा केल्या आहेत. त्यात दोन द्विशतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.

५४५ धावांसह यशस्वी जैस्वाल सध्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. यशस्वीने उर्वरित दोन कसोटी सामन्यांमध्ये एकूण २३० धावा केल्या तर तो कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनू शकेल.