'बॅझबॉल'ने लावली इंग्लंडच्या संघाची वाट..! 'ही' आहेत पाहुण्यांच्या पराभवाची ५ महत्त्वाची कारणं

भारताने इंग्लंड विरूद्धची मालिका ४-१ने दणक्यात जिंकली

5 reasons of England loss, IND vs ENG 5th Test: टीम इंडियाने शेवटच्या कसोटीच इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव करत पाच सामन्यांची मालिका 4-1ने जिंकली. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येताना 'बॅझबॉल'ची खूप हवा करण्यात आली होती. टेस्टमध्ये टी२० स्टाइल फटकेबाजी असा बॅझबॉलचा सोपा अर्थ होतो. पण त्यांचा प्लॅन त्यांच्यावरच उलटला. जाणून घेऊया इंग्लंडच्या पराभवाची 5 महत्त्वाची आणि ठळक कारणं.

मालिकेतील अंतिम सामन्यात इंग्लंड एक डाव आणि ६४ धावांनी पराभूत झाला. या पराभवासह इंग्लंडने मालिका 4-1 अशी गमावली. या मालिकेत इंग्लंड संघाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे बॅझबॉल रणनीति. भारता विरुद्धच्या त्यांनी जो प्लॅन आखला तो त्यांनाच जमला नाही. बॅझबॉलने त्यांची वाट लावली. कारण भारतीय पिचवर वेगाने धावा काढण्याचा प्रयत्न करताना त्यांचे फलंदाज विकेट्स गमावत राहिले.

बेन स्टोक्स हा जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे यात शंका नाही, पण भारत दौऱ्यावरील कसोटी मालिकेतील त्याचे नेतृत्वकौशल्या अतिसामान्य होते. संपूर्ण मालिकेत इंग्लंड संघाची रणनीति अनाकलनीय राहिली. प्रत्येक सामन्यातील बदलांमुळे अस्थिरता होती, त्यामुळे भारताला घरच्या मैदानावर रोखता आले नाही. कर्णधार म्हणून स्टोक्स इंग्लंडसाठी पूर्णपणे अपयशी ठरला.

भारत दौऱ्यात फिरकी गोलंदाजीत इंग्लंडची अवस्था फारच वाईट होती. विशेषत: जॅक लीच आणि रेहान अहमद या मालिकेतून बाहेर पडल्यानंतर त्यांची गोलंदाजी खूपच कमकुवत दिसत होती. इंग्लंडकडे शोएब बशीर आणि टॉम हार्टले यांच्या रूपाने दोन फिरकी गोलंदाज शिल्लक होते, पण भारतीय खेळाडूंसमोर यापैकी कोणालाही यश मिळाले नाही. टीम इंडियाच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या नवख्या फिरकीपटूंना भरपूर चोप दिला आणि धावा लुटल्या.

वरच्या फळीतील फलंदाज ठरले 'फ्लॉप'- भारता विरुद्धच्या मालिकेत इंग्लंडचे वरच्या फळीतील फलंदाजांची कामगिरी अत्यंत खराब होती. त्यांना संघाला चांगली सुरुवात करुन देता आली नाही. त्यामुळेच इंग्लंडला भारताविरुद्ध धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागला. अव्वल कामगिरी करण्यात आलेले अपयश हे देखील त्यांच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण होते.

धर्मशाला कसोटीत इंग्लंडला पूर्णपणे घरच्या सारखे थंड वातावरण मिळाले होते. असे असूनही पाहुण्या संघाला त्याचा लाभ घेता आला नाही. पहिल्या दिवशी फलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर इंग्लंडचे खेळाडू पूर्णपणे बेजबाबदार खेळले. इंग्लंडने मालिकेतील प्रत्येक सामन्यात घाई केली, त्यामुळे त्यांना मालिका गमवावी लागली.