India vs England 5th Test : भारत-इंग्लंड यांच्यातली पाचवी कसोटी १ जुलैपासून सुरू होणार आहे. रोहित शर्माचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे टीम इंडियाचं टेंशन वाढलं आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मागच्या दौऱ्यावर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिकेचा निकाल ठरवण्यासाठी एडबस्टन कसोटी महत्त्वाची आहे.
मागच्या दौऱ्यावरील इंग्लंडचा संघ व आताचा इंग्लंडचा संघ यात बराच फरक जाणवतोय. इंग्लंडचा संघ बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली फॉर्मात आलेला दिसतोय... जो रूटने कर्णधारपदावरून हटण्याचा निर्णय घेतला आणि बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली पहिल्याच मालिकेत इंग्लंड ३-० अशा फरकाने न्यूझीलंडला पराभूत करण्याच्या मार्गावर आहे.
कर्णधार बेन स्टोक्स व मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांची आक्रमक शैली यामुळे इंग्लंडचा संघ हा टीम इंडियापेक्षा वरचढ दिसतोय. अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर इंग्लंडच्या संघात जणून जीवंतपणा आला आहे. स्टोक्स कसोटीतही ट्वेंटी-२० स्टाईलने फलंदाजी करतो. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत २९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्टोक्स मैदानावर आला अन् आक्रमक ५० धावा चोपल्या.
जो रूट, स्टुअर्ट ब्रॉड, जॉनी बेअरस्टो व बेन स्टोक्स यांचा फॉर्म बोलका आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट याने २०२१मध्ये कसोटीत एकट्याने २०००+ धावा केल्या आहेत. त्यात १० शतकांचा समावेश आहे. त्याने इंग्लंडमध्येच नव्हे, तर आशियाई देशांत, वेस्ट इंडिज येथेही खोऱ्याने धावा केल्यात. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत बेअरस्टोने ७२ चेंडूंत १३६ धावांची स्फोटक खेळी करून दिली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याच्या नावावर सर्वाधिक धावा होत्या. ब्रॉडला खेळणे म्हणजे आगीच्या गोळ्यासमोर उभे राहण्यासारखे आहे.
ब्रेंडन मॅक्युलम याची कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करणे हा मास्टरस्ट्रोक ठरला. न्यूझीलंडच्या माजी कर्णधाराचा आक्रमक खेळ सर्वांना माहित्येय.. त्याचे निर्भीत वृत्ती हीच प्लस पॉईंट आहे आणि इंग्लंडच्या संघातही त्याने तिच रुजवण्याचा प्रयत्न केला आहे.
ऑली पोप हा इंग्लंडला कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर मिळालेला सक्षम पर्याय आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी त्याने ३ सामन्यांत २९९ धावा केल्या आहेत.
मॅक्युलम व स्टोक्स यांच्या आगमनामुळे इंग्लंडचा संघ बराच बदलला आहे. जो रुट व ख्रिस सिलव्हरवूड यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडने दोन वर्षांत १७ पैकी केवळ एकच कसोटी जिंकली. रोरी बर्न्स व हसीब हमीद हे सलामीला अपयशी ठरले. अॅलेक्स रिस व झॅक क्रॅवली हे चांगली कामगिरी करत आहेत.