IND vs ENG, Indian Players Emotional: भारतीय संघ विश्वचषकातून बाहेर! इंग्लंडविरूद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर रोहितसेना भावुक

आज भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये उपांत्य फेरीचा सामना पार पडला. लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर भारतीय खेळाडू भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर रंगलेल्या टी-२० विश्वचषकातून भारतीय संघ बाहेर झाला आहे. इंग्लंडविरूद्धच्या पराभवानंतर भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. ४ साखळी सामने जिंकून भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. मात्र उपांत्य फेरीत आज इंग्लिश संघाने भारताचा १० गडी राखून मोठा पराभव केला. भारताने दिलेल्या १६९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग इंग्लिश संघाने केवळ १६ षटकांत पूर्ण केला.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. भारताची सुरूवात निराशाजनक झाली. सलामीवीर लोकेश राहुल दुसऱ्याच षटकातील चौथ्या चेंडूवर स्वस्तात माघारी परतला. कर्णधार रोहित शर्मा देखील २८ चेंडूत २७ धावांची सावध खेळी करून तंबूत परतला. त्यानंतर संघाची धुरा विराट कोहलीने सांभाळली आणि शानदार अर्धशतकी खेळी केली.

भारतीय संघाचा मिस्टर ३६० म्हणून ओळखला जाणारा सूर्यकुमार यादव देखील आज स्वस्तात माघारी परतला. त्याला आदिल राशिदने आपल्या फिरकीच्या जोरावर माघारी पाठवले. इंग्लिश कर्णधार जोस बटलरने केलेल्या चालाकीमुळे भारताला मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागला. रिषभ पंत खेळपट्टीवर येण्याआधीच बटलरने आदिल राशिदचे षटके संपवण्याचा प्रयत्न केला आणि याचा पुरेपुर फायदा राशिदने घेतला. पंत डाव्या हाताने खेळणारा फलंदाज असल्यामुळे तो राशिदविरूद्ध आक्रमक होईल अशी अपेक्षा होती पण त्याआधीच बटलरने सावध भूमिका घेतली.

विराट कोहली ४० चेंडूत ५० धावांची खेळी करून बाद झाला. तर सूर्याला केवळ १० धावा करता आल्या. मात्र त्यानंतर हार्दिक पांड्याने ३३ चेंडूत ६३ धावांची ताबडतोब खेळी केली. पांड्याने ४ चौकार आणि ५ चौकारांच्या जोरावर इंग्लंडसमोर १६९ धावांचे सन्मानजनक आव्हान ठेवले. मात्र भारतीय गोलंदाजांना अपयश आले आणि इंग्लिश संघाने १० गडी राखून मोठा विजय मिळवून फायनलचे तिकिट मिळवले. फायनलला मुकल्यानंतर भारतीय खेळाडू भावुक झाल्याचे पाहायला मिळवले.

भारताकडून हार्दिक पांड्याने डाव सावरला मात्र इंग्लिश गोलंदाजांनी इतर कोणत्याच भारतीय फलंदाजाला टिकू दिले नाही. इंग्लंडच्या गोलंदाजांनी सुरूवातीपासूनच भारतीय फलंदाजांवर दबाव राखून ठेवला. लोकेश राहुलला दुसऱ्याच षटकात माघारी पाठवल्यानंतर रोहित आणि सूर्याला देखील स्वस्तात माघारी पाठवले. इंग्लिश संघाकडून ख्रिस जॉर्डनने सर्वाधिक ३ बळी पटकावले. तर ख्रिस वोक्स आणि आदिल राशिद यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.

इंग्लंडच्या डावात एकतर्फी खेळ पाहायला मिळाला. इंग्लिश संघाचे सलामीवीर ॲलेक्स हेल्स आणि जोस बटलर यांनी १६९ धावांची भागीदारी नोंदवून विजय मिळवला. या भागीदारीसह त्यांनी नवा विक्रम केला आहे. हेल्स सुरूवातीपासूनच आक्रमक खेळी करत होता, त्याला कर्णधार बटलरने वेळोवेळी साथ दिली. हेल्सने ७ षटकार आणि ४ चौकारांच्या जोरावर ४७ चेंडूत ८६ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली.

ॲलेक्स हेल्स पाठोपाठ कर्णधार जोस बटलरने देखील आक्रमक रूप धारण केले. बटलरने ३ षटकार आणि ९ चौकारांच्या जोरावर ४९ चेंडूत ८० धावांची शानदार खेळी केली. बटलर-हेल्सच्या जोडीसमोर कोणत्याच भारतीय गोलंदाजाचा टिकाव लागला नाही. भारतीय गोलंदाजांच्या अपयशामुळेच भारतीय संघाला विश्वचषकातून बाहेर व्हावे लागले आहे. मोठ्या मंचावर मोठा पराभव झाल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माचा चेहरा भारतीय चाहत्यांची व्यथा सांगणारा होता. रोहित सामना संपल्यानंतर ड्रेसिंगरूममध्ये एकांतात बसून भावुक झाला.

इंग्लिश संघाच्या आक्रमक खेळीमुळे भारताच्या प्रमुख गोलंदाजांना त्यांची ४ षटके टाकण्याचीही संधी मिळाली नाही. भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी २-२ षटकांत अनुक्रमे २५ आणि १५ धावा दिल्या. अक्षर पटेलने ४ षटकांत ३० धावा दिल्या. तर मोहम्मद शमीला बटलर-हेल्सच्या जोडीने ३ षटकांत ३९ धावा चोपल्या.

भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर भारतीय खेळाडू भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. मैदानातच खेळाडूंचे चेहरे सर्वकाही सांगत होते. अशातच कर्णधार रोहित शर्माचे भावुक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. रोहित शर्मासह संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा देखील चेहरा पडला. सुरूवातीपासून शानदार खेळी करत आलेल्या भारतीय संघाला उपांत्य फेरीपर्यंतच समाधान मानावे लागले आणि पुन्हा एकदा विश्वचषकाच्या ट्रॉफीने संघाला हुलकावणी दिली.