India vs Netherlands , T20 World Cup : काल मेलबर्नवर पावसामुळे इंग्लंड व न्यूझीलंड यांना खूप मोठा फटका बसला. इंग्लंडला ५ धावा कमी पडल्याने आयर्लंडकडून DLS नुसार हार मानावी लागली, तर न्यूझीलंडला अफगाणिस्तानसोबत १-१ गुण वाटून घ्यावे लागले.
भारताच्या ग्रुप २ मध्येही दक्षिण आफ्रिकेला झिम्बाब्वेविरुद्ध एका गुणावर समाधान मानावे लागले. आज भारत आणि नेदरलँड्स यांच्यात सिडनी येथे मॅच होणार आहे, परंतु त्यावर पावसाचे सावट घोंगावत आहे. सध्या दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेस यांचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरू आहे आणि त्यातही पावसाचा व्यत्यय येतोय.
सायंकाळी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे आणि अशात भारत-नेदरलँड्स सामना न झाल्यास काय?
भारताने पहिल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला. ग्रुप २ मध्ये बांगलादेशनेही विजयाची नोंद करून सरस नेट रन रेटच्या जोरावर अव्वल स्थान पटकावले आहे. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यातला सामना पावसामुळेच अनिर्णित राहिला आणि दोघांना एकेक गुण मिळाले.
आफ्रिकेच्या या निकालामुळे पाकिस्तानचे उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा पल्लवीत झाल्या. आता भारत-नेदरलँड्स मॅच पावसामुळे रद्द होणार असे संकेत मिळाल्याने पाकिस्तानच्या ताफ्यातील आनंद द्विगुणित झाला असेल. भारतीय वेळेनुसार दुपारी १२.३० वाजता हा सामना सुरू होणार आहे आणि तेव्हा पावसाची शक्यता ८० टक्के वर्तवण्यात येत आहे.
+०.४५० नेट रन रेटच्या जोरावर बांगलादेश सध्या अव्वल स्थानावर आहे. भारताच्या खात्यातही २ गुण आहेत, परंतु त्यांचा नेट रन रेट ०.०५० असा आहे. त्यात जर आजचा सामना रद्द झाला, तर भारत-नेदरलँड्स यांना प्रत्येकी १ गुण मिळेल.
अशात बांगलादेश-दक्षिण आफ्रिका यांच्यातील विजेता भारताला मागे टाकेल. समजा जर बागलादेश जिंकल्यास त्यांचे चार गुण होतील आणि ते अव्वल स्थानी कायम राहतील. आफ्रिका जिंकल्यास नेट रन रेटवर ते दुसऱ्या स्थानी सरकू शकतात. भारतीय संघ ३ गुणांसह तिसऱ्या, तर झिम्बाब्वे व नेदरलँड्स प्रत्येकी १ गुणासह तालिकेत राहतील.
पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात आज सायंकाळी सामना होईल आणि त्यात पाकिस्तान जिंकल्यास ते चौथ्या क्रमांकावर येतील. अशात भारताला उर्वरित तीन ( बांगलादेश, आफ्रिका व झिम्बाबे) लढती जिंकाव्या लागतील आणि तरच त्यांचे उपांत्य फेरीचे स्थान पक्के होईल. पाकिस्तान भारताच्या मार्गात अडथळा आणू शकतो.