IND vs NZ 2nd Test: भारतीय खेळाडूंनी दुसऱ्या डावातही दमदार कामगिरी करताना न्यूझीलंडसमोर तगडं आव्हान उभं केलं. मयांक अग्रवालनं दुसऱ्या डावातही अर्धशतकी खेळी केली, त्याला चेतेश्वर पुजारा, शुबमन गिल, अक्षर पटेल व विराट कोहली यांची तोडीसतोड साथ मिळाली.
एजाझ पटेलनं याही डावात उल्लेखनीय कामगिरी करताना न्यूझीलंडच्या पदरात यशाचे थोडे थेंब टाकले आणि यावेळी त्याच्यासोबतीला राचिन रविंद्रही आला. पण, भारतानं उभं केलेलं आव्हान पार करणं न्यूझीलंडला जमणारं नाही.
भारतीय संघानं दुसऱ्या कसोटीत निर्विवाद वर्चस्व राखले आहे. मयांक अग्रवाल ( १५०), अक्षर पटेल ( ५२) व शुबमन गिल ( ४४) यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियानं पहिल्या डावात ३२५ धावा केल्या. न्यूझीलंडचा गोलंदाज एजाझ पटेल (Ajaz Patel) यानं भारताच्या १० फलंदाजांना बाद करून विक्रमी कामगिरी केली.
जिम लेकर व अनिल कुंबळे यांच्यानंतर कसोटीत एका डावात १० विकेट्स घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. पण, त्याच्या या मेहनतीवर किवी फलंदाजांनी पाणी फिरवले. न्यूझीलंडचा पहिला डाव भारतीय गोलंदाजांनी अवघ्या ६२ धावांवर गुंडाळला. आऱ अश्विननं चार, मोहम्मद सिराजनं ३, अक्षर पटेलनं दोन व जयंत यादवनं एक विकेट घेतली.
कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कॅच घेण्याच्या प्रयत्नात शुबमन गिलनं बोटाला दुखापत करून घेतली आणि त्यामुळे चेतेश्वर पुजारा व मयांक अग्रवाल ही जोडी सलामीला आली. भारतानं Follow on न देता पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, विराट कोहलीनं फॉलो ऑन न दिल्यानं सध्या सोशल मीडियावर याची चर्चा रंगत आहे. न्यूझीलंडचा माजी फिरकीपटू डॅनिअल विटोरी यानं याप्रकरणी कर्णधार विराट कोहलीची बाजू घेतली आहे.
दुसऱ्यांदा फलंदाजीचा निर्णय घेऊन विराट कोहलीनं योग्य केलं, असं मत विटोरी यानं व्यक्त केलं. ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना त्यानं यावर भाष्य केलं. बहुतांश संघाचे कर्णधार फॉलो ऑन न देण्यासाठी आग्रही असतात. गोलंदाजांना त्यांच्या वर्कलोडमुळे आराम देणं हे त्यामागील कारण असतं, असं तो म्हणाला.
'भारतानं केवळ २८-२९ ओव्हर्सच टाकल्या होत्या. विराट कोहलीला फॉलो ऑनचा पर्याय निवडता आला असता आणि तो न्यूझीलंडवर दबावही आणू शकला असता. भारतानं असं केलं नाही आणि त्यात काही चुकीचंही नाही. न्यूझीलंडला पुनरागमन करणं कठीण आहे, जवळपास अशक्यच आहे,' असंही विटोरीनं नमूद केलं.