IND vs NZ : शिकाऱ्यांची शिकार झाली! आपल्याच घरात भारताचा दारुण पराभव; टीम इंडिया कुठे चुकली?

ind vs nz 2nd test : न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटी सामन्यासह प्रथमच भारतात कसोटी मालिका जिंकली.

न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना बलाढ्य भारताला प्रथमच त्यांच्या घरात हरवले. पुणे कसोटीत भारताचा दारुण पराभव झाला आणि पाहुण्या किवी संघाने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. बंगळुरू आणि पुणे कसोटीतील पराभवासह भारत मोठ्या कालावधीनंतर मालिका जिंकण्यात अपयशी ठरला.

मागील तब्बल २९५ महिन्यांमध्ये केवळ तीन संघांना भारतीय भूमीवर कसोटी मालिका जिंकता आली आहे. याआधी ऑस्ट्रेलिया (२००४) आणि इंग्लंडने (२०१२) ही किमया साधली होती. आता या यादीत न्यूझीलंडच्या (२०२४) संघाचा समावेश झाला आहे.

दरम्यान, न्यूझीलंडच्या संघाने ६९ वर्षांनंतर टीम इंडियाला भारतात कसोटी मालिकेत पराभूत केले. न्यूझीलंडच्या क्रिकेटसाठी हा सोनेरी क्षण असून, दारुण पराभवामुळे भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या सेनेला लक्ष्य केले जात आहे. श्रीलंकेविरुद्धच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर किवी संघाने जोरदार पुनरागमन केले आणि अव्वल स्थानी असलेल्या भारताला पराभवाची धूळ चारली.

विशेष बाब म्हणजे भारतीय संघ तब्बल ४,३३१ दिवसांनंतर आपल्या मायदेशात कसोटी मालिकेत विजय मिळवण्यात अपयशी ठरला. भारतीय संघाची ताकद म्हणजे फिरकी गोलंदाज अशी टीम इंडियाची ओळख आहे.

भारतीय धरतीवर नेहमीच फिरकीपटूंचा दबदबा राहिलाय. त्यामुळेच पुणे कसोटीत कर्णधार रोहित शर्माने आर अश्विन, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर अशा तीन फिरकीपटूंना संधी दिली. वॉशिंग्टनने 'सुंदर' कामगिरी करताना पहिल्या डावात सात बळी घेऊन त्याचे काम केले. मात्र, भारतीय फलंदाजांना आलेले अपयश टीम इंडियाला पराभवाकडे घेऊन गेले.

पहिल्या आणि दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल वगळता एकाही भारतीय फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. कर्णधार रोहित शर्माला त्याचा अतिआत्मविश्वास नडला असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. तर आघाडीचा फलंदाज विराट कोहली पहिल्या डावात हास्यास्पदपणे फुल टॉस चेंडूवर बाद झाला, तर दुसऱ्या डावात त्याला मिचेल सँटनरने एलबीडब्ल्यू बाद केले.

'शिकाऱ्यांचीच शिकार झाली', होय... भारतीय फिरकीपटूंनी परदेशी फलंदाजांना अनेकदा आपल्या फिरकीच्या तालावर नाचवले आहे. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात किवी संघातील फिरकीपटूंनी आपली ताकद दाखवली. मिचेल सँटनरने पोषक खेळपट्टीचा फायदा घेत पहिल्या डावात सात आणि दुसऱ्या डावात सहा बळी घेऊन यजमान संघाच्या फलंदाजीची कंबर मोडली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने पहिल्या डावात अवघ्या २५९ धावा केल्या होत्या. मात्र याचा फायदा घेण्यात टीम इंडिया अपयशी ठरली अन् भारत आपल्या पहिल्या डावात केवळ १५६ धावांत गारद झाला. मग मिळालेल्या आघाडीचा फायदा घेत पाहुण्या संघाने साजेशी कामगिरी करत आपल्या दुसऱ्या डावात २५५ धावा करुन चांगली आघाडी घेतली.

भारतासमोर विजयासाठी ३५९ धावांची आवश्यकता होती. पण, भारतीय फलंदाज पुन्हा एकदा आक्रमक खेळी करण्याचा नादात फसले. जैस्वालचा (७७) अपवाद वगळता एकालाही मोठी खेळी करता आली नाही. अखेर भारत २४५ धावांत सर्वबाद झाला अन् ११३ धावांनी सामन्यासह मालिका गमावली.

बारा वर्षांनंतर भारतात कसोटी मालिका जिंकणारा न्यूझीलंड हा पहिला संघ ठरला आहे.