IND vs NZ, 3rd ODI Live : रोहित शर्माने एकाही भारतीय कर्णधाराला न जमलेली कामगिरी केली; एका दगडात मारले दोन पक्षी

India vs New Zealand, 3rd ODI Live : भारतीय संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात ९५ धावांनी न्यूझीलंडवर विजय मिळवला. भारताच्या ३८५ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ २९५ धावांवर तंबूत परतला.

रोहित ८५ चेंडूंत ९ चौकार व ६ षटकार खेचून १०१ धावांवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर शुभमन ७८ चेंडूंत १३ चौकार व ५ षटकारांसह ११२ धावांवर ब्लेअर टिकनरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. इशान व विराट यांनी ३८ धावांची भागीदारी केली. इशान १७ धावांवर रन आऊट झाला, पाठोपाठ विराट ३६ धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादव ( १४) व वॉशिंग्टन सुंदर ( ९) हेही माघारी परतले.

० बाद २१२ वरून भारताची अवस्था ६ बाद ३१३ अशी झाली. हार्दिक पांड्या व शार्दूल ठाकूर यांनी ३४ चेंडूंत ५४ धावांची भागीदारी केली. शार्दूल १७ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह २५ धावांवर माघारी परतला. हार्दिक ३८ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ५४ धावांवर बाद झाला. किवी गोलंदाज जेकब डफीने १० षटकांत १०० धावा देत ३ विकेट्स घेतल्या. भारताने ९ बाद ३८५ धावा केल्या.

फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर न्यूझीलंडकडूनही जबरदस्त खेळ होईल अशी अपेक्षा होती, परंतु हार्दिक पांड्याने पहिल्याच षटकात फिन अ‌ॅलनला माघारी पाठवले. डेव्हॉन कॉनवे व हेन्री निकोल्स यांनी १०६ धावांची भागीदारी करून न्यूझीलंडचा डाव रुळावर आणला. पण, कुलदीप यादपने निकोल्सला ( ४२) पायचीत करून ही जोडी तोडली.

कॉनवे व डॅरील मिचेल यांची ७८ धावांची सेट झालेली जोडी शार्दूल ठाकूरने अनपेक्षित बाऊन्सर टाकून तोडली. मिचेलला २४ धावांवर माघारी जावे लागले. शार्दूलने पुढच्याच चेंडूवर किवी कर्णधार टॉम लॅथमला ( ०) माघारी पाठवून मॅच फिरवली. पुढच्याच षटकात शार्दूलने चतुराईने गोलंदाजी करताना ग्लेन फिलिप्सला ( ५) विराट कोहलीच्या हाती झेल देण्यास भाग पाडले.

भारताने ही मालिका ३-० अशी जिंकून आयसीसी वन डे क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली. भारतीय संघ ट्वेंटी-२०तही अव्वल स्थानावर आहे आणि कसोटीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकून भारताला कसोटीत अव्वल येण्याची संधी आहे.

न्यूझीलंडचा निम्मा संघ २०० धावांवर परतला माघारी. कॉनवे १०० चेंडूंत १२ चौकार व ८ षटकारांसह १३८ धावांवर माघारी परतला. मायकेल ब्रेसवेल व मिचेल सँटनर ही जोडी खेळपट्टीवर होती, पण आज ती कमाल करू शकली नाही. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ २९५ धावांवर माघारी परतला आणि भारताने ९० धावांनी सामना जिंकला. शार्दूल व कुलदीप यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

भारताने ११४ रेटींग गुणांसह आयसीसी वन डे क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. इंग्लंडला ( ११३) मागे टाकले. भारताने १३ वर्षांनंतर वन डे मालिकेत निर्भेळ यश मिळवले. वन डे आणि ट्वेंटी-२० मालिकेत न्यूझीलंडला क्लीन स्वीप देणारा रोहित शर्मा हा पहिला भारतीय कर्णधार ठरला.