IND vs NZ: 'टीम इंडिया'ला १३ वर्षांनंतर पुन्हा इतिहास रचण्याची संधी, रोहितला खुणावतोय 'हा' मोठा विक्रम

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या चांगलाच फॉर्मात असल्याचे दिसतंय

Rohit Sharma IND vs NZ 3rd ODI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वन डे सामना आज इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून Team India १३ वर्ष जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती करू शकते. पहिल्या दोन सामन्यातील भारतीय संघांची कामगिरी पाहता न्यूझीलंडवर यजमान नक्कीच भारी पडू शकतात.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वन डे सामना महत्त्वाचा असणार आहे. टीम इंडियाने या आधीच वन डे मालिका २-०ने जिंकली आहे. अशा परिस्थितीत तिसरी वन डे जिंकण्याची आणि मालिकेत न्यूझीलंडला व्हाईटवॉश देण्याची एक अतिशय चांगली संधी भारतीय संघाला आहे.

जर टीम इंडियाने तिसरा आणि शेवटचा सामना जिंकून मालिकेत क्लीन स्वीप दिला, तर तब्बल १३ वर्षांनंतर एका विशेष अशा इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. इतकेच नव्हे तर त्याचबरोबर कर्णधार म्हणून रोहित शर्माचे नावही एका विशेष रेकॉर्ड बूक मध्ये जाऊ शकते. जाणून घेऊया त्याबद्दल...

भारताने २०१० मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या 5 वन डे मालिकेत त्यांना क्लीन स्वीप केलं होतं. तेव्हा संघाचा कर्णधार गौतम गंभीर होता. तसेच १९८८ मध्ये टीम इंडियाने पाच पैकी चार एकदिवसीय सामने जिंकली होते आणि पाचवा सामना रद्द झाला होता. तेव्हा संघाचे कर्णधार दिलीप वेंगसरकर होते.

जर टीम इंडियाने आज इंदोरमध्ये होणारा सामना जिंकला तर भारतीय संघ १३ वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती करण्यात यशस्वी होईल. आतापर्यंतची रोहित शर्माच्या यंग ब्रिगेडची कामगिरी लक्षात घेता भारतीय संघ न्यूझीलंडवर विजय प्राप्त करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

भारताने जर हा विजय साकारला तर कर्णधार रोहित शर्मा याच्या नावावरही एक मोठा पराक्रम होईल. दिग्गज कर्णधारांच्या यादीत त्याला सामील होण्याची संधी आहे. कारण अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा केवळ तिसराच कर्णधार बनणार आहे.