India vs New Zealand : ऑस्ट्रेलियात आलेल्या अपयशानंतर BCCI ने २०२३ चा वन डे व २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे सीनियर्स खेळाडूंना वन डे क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले आहे, तर ट्वेंटी-२०साठी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंना घडवण्याचे काम सुरू झाले आहे. त्याची सुरुवात न्यूझीलंड दौऱ्यापासून होणार आहे.
शुक्रवारपासून येथे तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. आज या मालिकेच्या चषकाचे अनावरण करण्यात आले आणि यावेळी कर्णधार हार्दिकने ( Hardik Pandya) २०२४च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या तयारीला सुरुवात झाल्याची घोषणा केली. यावेळी त्याने सगळ्यांना समान संधी मिळेल असेही म्हटले.
शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत भारताचे नेतृत्व करणाऱ्या पांड्याने सांगितले की, ''संघाला वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशातून बाहेर पडण्याची गरज आहे. होय, आम्हा सर्वांना माहित आहे, की वर्ल्ड कपमध्ये आमच्या पदरी निराशा आली आहे. पण, आम्ही प्रोफेशनल खेळाडू आहोत आणि या परिस्थितीचा सामना करणे आवश्यक आहे. आम्ही यशाचा, अपयशांचा कसा सामना करतो आणि चुका सुधारून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो.''
पुढील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळला जाईल. भारतीय संघात पुढील दोन वर्षांमध्ये मोठ्या संक्रमणाची अपेक्षा आहे. विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासारख्या खेळाडूंना हळूहळू ट्वेंटी-२० संघातून बाहेर काढले जाईल, अशी शक्यता आहे.
'होय, पुढील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जवळपास दोन वर्षांनंतर आहे, त्यामुळे आमच्याकडे नवीन प्रतिभा शोधण्यासाठी वेळ आहे. यादरम्यान भरपूर क्रिकेट खेळले जाईल आणि बर्याच लोकांना पुरेशी संधी मिळेल. वर्ल्ड कपची तयारी आत्तापासून सुरू होत आहे. पण, अजून बराच वेळ आहे. सध्यातरी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत खेळण्याचा खेळाडूंनी आनंद घ्यावा. भविष्याबद्दल नंतर बोलू,' असेही तो पुढे म्हणाला.
न्यूझीलंड दौऱ्यात तीन ट्वेंटी- २० आणि तीन वन डे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, सलामीवीर लोकेश राहुल, दिनेश कार्तिक आणि अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन यांचा समावेश या मालिकेत नाही. वर्क लोड मॅनेजमेंटचा भाग म्हणून त्यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या अनुपस्थितीत शुबमन गिल, उम्रान मलिका, इशान किशन व संजू सॅमसन यांना चांगली संधी आहे.
'मुख्य खेळाडू नाहीत, पण त्याच वेळी उदयोन्मुख युवा खेळाडू या मालिकेत खेळणार आहेत. तेही आता दीड-दोन वर्षांपासून खेळत आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि त्यांच्याकडील कौशल्य दाखवण्यासाठी पुरेशा संधी आणि पुरेसा वेळ मिळाला आहे. युवा खेळाडूंचा समूह, नवीन ऊर्जा आणि उत्साह, हे पाहून मीच खूप उत्साही झालो आहे. प्रत्येक मालिका महत्त्वाची असते. तुम्ही एखादा आंतरराष्ट्रीय सामना महत्त्वाचा नसल्याचा विचार करून खेळू शकत नाही,''असेही पांड्याने स्पष्ट केले.
उपांत्य फेरीतील पराभवानंतर एका स्तंभात, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने लिहिले की, २०११ मध्ये मायदेशात वन डे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारताने काहीही साध्य केले नाही. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सर्वात खराब कामगिरी करणारा संघ म्हणून इतिहासात भारतीय संघाची नोंद झाली आहे.
वॉनच्या टीकेबद्दल विचारले असता, पांड्या म्हणाला, “मला वाटत नाही की आम्हाला कोणाला काही सिद्ध करण्याची गरज आहे. जर तुम्ही चांगली कामगिरी करत नाही, तेव्हा लोकांच्या मतांचा आम्ही आदर करतो. लोकांचे दृष्टिकोन वेगळे असतात, हे मी समजू शकतो. हा एक खेळ आहे, तुम्ही चांगले खेळण्याचा प्रयत्न करत राहा आणि अखेरीस अपेक्षित निकाल येईल. आम्ही काही गोष्टींवर काम करणे आवश्यक आहे, पुढे जाऊन आम्ही दुरुस्त करू आणि त्यावर काम करू.'