IND vs NZ, Mohammed Siraj: "त्याला आगामी वर्ल्ड कपमध्ये खेळताना पाहायचे आहे", सिराजच्या आईने व्यक्त केली भावना

mohammed siraj family: सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वन डे मालिकेचा थरार रंगला आहे.

सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वन डे मालिकेचा थरार रंगला आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात विजय मिळवून विजयी सलामी दिली आहे. न्यूझीलंडच्या मायकेल ब्रेसव्हेलने एकतर्फी झुंज दिली मात्र, त्याला पराभव टाळता आला नाही.

प्रथम फलंदाजी करताना भारताकडून शुबमन गिलने (Shubman Gill) विक्रमी खेळी केली. त्याने 149 चेंडूंत 19 चौकार व 9 षटकारांसह 208 धावांची खेळी केली आणि भारताची धावसंख्या 349 धावांपर्यंत पोहोचवली.

लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचे 6 फलंदाज 131 धावांवर माघारी परतल्यानंतर भारत सहज विजय मिळवेल असाच अंदाज होता. पण, मायकेल ब्रेसव्हेल व मिचेल सँटनर यांनी 102 चेंडूंत 162 धावांची विक्रमी भागीदारी करताना यजमानांना अखेरपर्यंत टक्कर दिली.

दरम्यान, ब्रेसव्हेलने विक्रमी शतक झळकावले, तर सँटनर अर्धशतक झळकावून माघारी परतला. मोहम्मद सिराजने मोक्याच्या क्षणी ही भागीदारी तोडली अन् सामन्यात रंगत आणली. हार्दिक पांड्याने 49 व्या षटकात 4 धावा देत भारताला विजयाचे स्वप्न दाखवले अन् शार्दूलने अखेरच्या षटकात ब्रेसव्हेलची विकेट घेत थरारक विजय पक्का केला.

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभारला होता. मात्र, किवी संघाकडून ब्रेसव्हेलने देखील शानदार खेळी केली आणि यजमानांची धाकधुक वाढवली. अशातच आपल्या घरच्या मैदानावर खेळत असलेल्या मोहम्मद सिराजने सॅंटनरला बाद करून भारतीय चाहत्यांना जागे केले.

खरं तर सिराजने 10 षटकांत केवळ 46 धावा देऊन 4 बळी पटकावले. भारताच्या विजयाचा हिरो ठरलेल्या सिराजला पाहण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी देखील हजेरी लावली होती.

मोहम्मद सिराजच्या कुटुंबीयांनी त्याच्या खेळीचे तोंडभरून कौतुक केले आहे, ज्याचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे. मी माझा पहिला आंतरराष्ट्रीय सामना माझ्या घरच्या मैदानावर खेळला. आपल्या लोकल क्राउडसमोर खेळण्याचा आनंद वेगळा असल्याचे सिराजने सांगितले.

तसेच सिराजच्या कुटुंबीयांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओत सिराजच्या आईने म्हटले, "माझ्या सिराजला असेच चांगले यश मिळो यासाठी मी दुआ करते. त्याने भारताचे नाव रोशन करावे. आगामी विश्वचषकात खेळताना आम्हाला सिराजला पाहायचे आहे."

28 वर्षीय सिराज सध्या देशातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज आहे आणि हैदराबादमध्ये झालेल्या पहिल्या वन डेत न्यूझीलंडवर संघाच्या रोमहर्षक विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावल्याने हा सामना त्याच्यासाठी खास राहिला.

मोहम्मद सिराजने घरच्या प्रेक्षकांसमोर सामना खेळला आणि 10 षटकांत 4 बळी घेतले. श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातही त्याने चार बळी घेतले होते.

घरच्या मैदानावर खेळण्यासाठी सिराज उत्साहित होता. त्याने सामन्यापूर्वी म्हटले होते की, "घरच्या मैदानावर हा माझा पहिला आंतरराष्ट्रीय सामना असेल. मी इथे फक्त आयपीएल खेळलो आहे. मला खूप आत्मविश्वास मिळेल कारण माझे कुटुंब आणि मित्र सामना पाहण्यासाठी तिथे असतील."

सिराजच्या आईला आपला मुलगा आपल्यासमोर लाईव्ह खेळत असल्याचे पाहून अभिमान वाटला. "मला आशा आहे सिराज भारताला अभिमान वाटेल अशी खेळी करेल. तसेच या वर्षाच्या अखेरीस भारतात होणारा वन डे विश्वचषक खेळण्यासाठी तो संघात स्थान मिळवेल अशी अपेक्षा आहे", अशा शब्दांत सिराजच्या आईने आपल्या भावना व्यक्त केल्या.