IND vs NZ: "रात्रीचे आकाश सूर्याने उजळून टाकले", सूर्यकुमारच्या खेळीवर विराट, सचिनह दिग्गजांनी केला प्रेमाचा वर्षाव

भारतीय संघाने न्यूझीलंडला त्यांच्या घरात जावून पराभवाची धूळ चारली.

सध्या न्यूझीलंडच्या धरतीवर भारत आणि किवी संघामध्ये टी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करावा लागला. मात्र आज झालेल्या सामन्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. भारताच्या सूर्यकुमार यादवने शतकी खेळी करून सामना अविस्मरणीय केला. तर दीपक हुड्डाने ४ बळी पटकावून सामन्यात रंगत आणली.

तत्पुर्वी, यजमान न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताकडून ईशान किशन आणि रिषभ पंत यांनी डावाची सुरूवात केली. मात्र रिषभ पंत केवळ ६ धावा करून तंबूत परतला. मात्र किशनने सावध ३६ धावांची खेळी करून साजेशी सुरूवात करून दिली. परंतु त्यालाही जास्त काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही आणि किशनला ईश सोधीने बाहेरचा रस्ता दाखवला.

त्यानंतर फलंदाजीची धुरा सूर्यकुमार यादवने सांभाळली. सूर्याने ५१ चेंडूत १११ धावांची शतकी खेळी करून इतिहास रचला. त्याच्या या खेळीत तब्बल ७ षटकार आणि ११ चौकारांचा समावेश होता. खरं तर सूर्याच्या या शतकी खेळीमुळे भारताने मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. सूर्यकुमारने सुरूवातीपासूनच ताबडतोब खेळी करून किवी संघाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.

भारताने दिलेल्या १९२ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना किवी संघाला घाम फुटला. कर्णधार केन विलियमसनने ५२ चेंडूत ६१ धावांची अर्धशतकी खेळी केली मात्र त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. त्याच्याशिवाय कोणत्याच किवी फलंदाजाला धावा करता आल्या नाहीत. अखेर न्यूझीलंडचा संघ १८.५ षटकांत १२६ धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने ६५ धावांनी मोठा विजय मिळवला.

मात्र सूर्याशिवाय कोणत्याच भारतीय फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. श्रेयस अय्यर आणि कर्णधार हार्दिक पांड्या प्रत्येकी १३-१३ धावा करून बाद झाले. तर दीपक हुड्डा आणि वॉशिंग्टन यांना खातेही उघडता आले नाही. न्यूझीलंडकडून टीम साउदीने सर्वाधिक ३ बळी पटकावले यासह हॅटट्रिक देखील आपल्या नावावर केली. याशिवाय लॉकी फर्ग्युसनला २ तर ईश सोधीला १ बळी घेण्यात यश आले.

भारतीय फिरकीपटूंनी सांघिक खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. दिपक हुड्डाने सर्वाधिक ४ बळी पटकावले, तर मोहम्मद सिराज आणि युझवेंद्र चहल यांना प्रत्येकी २-२ बळी घेता आले. याशिवाय भुवनेश्वर कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. भारताच्या विजयाचा हिरा ठरलेल्या सूर्यावर आता कौतुकाचा वर्षाव होत आहे.

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - ईशान किशन, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि युझवेंद्र चहल.

सूर्यकुमार यादवची शतकी खेळी पाहून भारतीय संघाचे आजी माजी खेळाडू प्रभावित झाले आहेत. विराट कोहलीने सूर्याचे कौतुक करताना म्हटले, "तो जगातील सर्वोत्कृष्ट का आहे हे दाखवणारी आजची खेळी होती. हा सामना मी लाईव्ह पाहिला नाही पण मला खात्री आहे की त्याची आणखी एक व्हिडीओ गेमसारखी खेळी होती."

क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील सूर्याच्या खेळीवर प्रेमाचा वर्षाव केला. "रात्रीचे आकाश सूर्याने उजळून टाकले आहे", अशा शब्दांत तेंडुलकरने सूर्याचे कौतुक केले. याशिवाय इरफान पठाण आणि युवराज सिंग यांनी देखील कौतुक केले आहे.

सूर्यकुमार यादव कोणत्याही ग्रहावर फलंदाजी करू शकतो असे इरफान पठाणने म्हटले. तर भारताच्या सिक्सर किंगने म्हटले, "सूर्याचा साक्षीदार", अशा आशयाचे ट्विट करून युवराज सिंगने सूर्यकुमार यादवच्या अविस्मरणीय खेळीला संबोधले.

सूर्यकुमार यादवने भारताच्या १९१ धावांपैकी १११ धावा चोपल्या. कॅलेंडर वर्षातील त्याचे हे टी-२०तील दुसरे शतक ठरले आणि रोहित शर्मा (१०२८) याच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय ठरला. सूर्याच्या या मेहनतीला गोलंदाजांचीही चांगली साथ मिळाली. भारतीय गोलंदाजांनीची कामगिरी उल्लेखनीय झाली आणि न्यूझीलंडला त्यांनी गुडघे टेकण्यास भाग पाडले. भारताने हा सामना सहज जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.