Join us  

IND vs NZ T20 Series: न्यूझीलंडविरुद्ध क्लिन स्वीप करत भारतानं केली पाकिस्तानच्या जागतिक विक्रमाची बरोबरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 1:09 PM

Open in App
1 / 13

टी २० विश्वचषक (T20 World Cup) मालिकेमध्ये भारताची कामगिरी निराशाजनक झाली होती. या मालिकेत पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभव झाल्यानंतर भारताची सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची आशा धुसर झाली होती. भारताला यानंतर सेमीफायनलपर्यंत मजल मारण्यातही अपयश आलं होतं.

2 / 13

परंतु नुकत्याच पार पडलेल्या टी २० आंतरराष्ट्रीय मालिकेमध्ये भारतानं न्यूझीलंडचा ३-० असा पराभव केला. या क्लिन स्वीपनंतर भारतानं पाकिस्तानच्या जागतिक विक्रमाची बरोबरी केली. द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक वेळा क्लिन स्वीप करण्याचा विक्रम हा यापूर्वी पाकिस्तानच्या नावे होता.

3 / 13

आता भारतानं न्यूझीलंडचा पराभव करत पाकिस्तानच्या विक्रमाशी बरोबरी केली. सहाव्यांदा टीन इंडियानं तीनपेक्षा अधिक सामन्यांच्या टी २० मालिकेमध्ये क्लिन स्वीप करण्याचा विक्रम केला आहे.

4 / 13

भारत आणि पाकिस्ताननंतर या यादीत पुढचा क्रमांक आहे तो म्हणजे अफगाणिस्तानचा. अफगाणिस्तानच्या संघानं पाच वेळा क्लिन स्वीपद्वारे मालिका जिंकली आहे. तर इंग्लंडनं चार वेळा, दक्षिण आफ्रिकेनं तीन वेळा अशा प्रकरे मालिका जिंकल्या आहेत.

5 / 13

भारतीय संघानं २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या विरोधात ३-०, २०१७ मध्ये श्रीलंकेविरोधात ३-०, २०१८ मध्ये वेस्ट इंडिजविरोधात ३-०, २०१९ मध्ये पुन्हा वेस्ट इंडिजविरोधात ३-०, २०२० मध्ये न्यूझीलंडविरोधात ५-० तर आता पुन्हा एकदा न्यूझीलंडविरोधात ३-० नं मालिकेवर कब्जा केला.

6 / 13

न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियानं आठव्यांदा टी २० आंतरराष्ट्रीय मालिकेवर कब्जा केला आहे. टी २० आंतरराष्ट्रीय मालिकेत सर्वाधिक धावांनी पराभव झालेली ही चौथी वेळ आहे. यापूर्वी न्यूझीलंडचा २०१० मध्ये पाकिस्ताननं १०३, २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेनं ७८ आणि २०१९ मध्ये इंग्लंडनं ७८ धावांनी पराभव केला होता.

7 / 13

भारतीय संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर रोहित शर्मा व राहुल द्रविड या नव्या जोडीच्या मार्गदर्शनाखाली पहिल्याच मालिकेत ३-०असा विजय मिळवला. न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत भारतीय संघानं प्रमुख खेळाडूंना विश्रांती देताना नव्या दमाच्या खेळाडूंना संधी दिली.

8 / 13

कर्णधार रोहितनं या युवा खेळाडूंना दडपणाशिवाय खेळण्याचा सल्ला दिला आणि त्याचा फायदा संघाला झाला. राहुल द्रविडनं या मालिकेपासून आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे संघातील उणीवा दूर करण्यावर त्यानं भर दिलेला पाहायला मिळाला.

9 / 13

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं न्यूझीलंडविरुद्धची मालिका ३-० अशी सहज खिशात घातली. तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात फलंदाजांच्या उल्लेखनीय योगदानानंतर गोलंदाजांनीही चोख भूमिका बजावली.

10 / 13

कर्णधार रोहितनं ( Rohit Sharma) पॉवर प्लेमध्ये अक्षर पटेलच्या ( Axar Patel) हाती चेंडू देऊन सामना सुरुवातीलाच किवींकडून हिसकावून घेतला. अक्षरनं पॉवर प्लेमध्ये २ धावांत ३ विकेट्स घेत पाहुण्यांना बॅकफूटवर टाकले आणि त्यानंतर अन्य गोलंदाज टप्प्याटप्प्यानं विकेट्स घेत राहिले. भारतानं हा सामना ७३ धावांनी जिंकला, ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्धचा हा भारताचा सर्वात मोठा विजय ठरला.

11 / 13

भारतीय संघानं तिसऱ्या ट्वेंटी-२०त न्यूझीलंडसमोर १८५ धावांचे लक्ष्य ठेवले. रोहित शर्माची अर्धशतकी खेळीनंतर इशान किशन, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, हर्षल पटेल व दीपक चहर यांनी चांगली कामगिरी करताना संघाला हा एव्हरेस्ट उभा करून दिला.

12 / 13

प्रत्युत्तरात किवींचे तीन फलंदाज ३० धावांवर माघारी परतले. पॉवर प्लेमध्ये अक्षर पटेलला गोलंदाजीला आणून रोहितनं चतुर खेळ केला. अक्षरनं त्याच्या दोन षटकांत २ धावा देत तीन विकेट्स घेतल्या. डॅरील मिचेल ( ५), मार्क चॅपमॅन ( ०) व ग्लेन फिलिप्स ( ०) यांना अक्षर पटेलनं बाद करून भारताचे निम्मे काम सोपे केले.

13 / 13

मार्टीन गुप्तील दुसऱ्या बाजूनं खिंड लढवत होता. त्यानं ३३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ५०वा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामना खेळणाऱ्या युझवेंद्र चहलनं टीम इंडियाला मोठी विकेट मिळवून दिली. सूर्यकुमार यादवनं सीमारेषेवर गुप्तीलचा सुरेख झेल टिपला. गुप्तीलनं ३६ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारासह ५१ धावा केल्या.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघपाकिस्तानन्यूझीलंडटी-20 क्रिकेट
Open in App