Join us  

IND vs PAK, Top 5 key Pakistan players: पाकिस्तानचे 'हे' 5 खेळाडू भारतासाठी ठरू शकतात डोकेदुखी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 1:18 PM

Open in App
1 / 7

IND vs PAK, Top 5 key Pakistan players: आशिया चषकाचा (Asia Cup 2022) थरार तब्बल ४ वर्षानंतर क्रिकेटरसिकांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. त्यातच दुग्धशर्करा योग म्हणजे, आज पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा सामना रंगणार आहे. जगातील कोणत्याही क्रिकेट स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामन्याइतकी उत्सुकता क्वचितच पाहायला मिळत असेल.

2 / 7

गेल्या वेळी भारत-पाकिस्तान हे संघ टी२० वर्ल्ड कपमध्ये आमनेसामने आले होते. त्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून एकतर्फी पराभव केला होता. योगायोगाने आजचा सामनादेखील युएईच्या मैदानावरच होणार आहे, जेथे भारताचा दारूण पराभव झाला होता. त्यामुळे आज भारताकडे पराभवाचा हिशेब चुकता करण्याची संधी आहे. मात्र, पाकिस्तानचे असे ५ खेळाडू आहेत, जे टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकतात. पाहूया त्याबद्दल सविस्तर...

3 / 7

शादाब खान (Shadab Khan) - पाकिस्तानी संघाचा अष्टपैलू लेग स्पिनर शादाब खान याच्यावर या स्पर्धेत बरीच जबाबदारी असेल. शादाब नजीकच्या काळात पाकिस्तानसाठी फार मोठे योगदान देऊ शकलेला नाही, परंतु आशिया चषक २०२२ हे त्याच्यासाठी चांगले व्यासपीठ ठरू शकते. त्याने आतापर्यंत ६४ टी२० सामने खेळले आहेत आणि २७५ धावा केल्या असून ७३ बळी घेतले आहेत.

4 / 7

बाबर आझम (Babar Azam) - पाकिस्तान क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि कर्णधार बाबर आझम हा तुफान फॉर्ममध्ये आहे. तो पाकिस्तान संघाचा खरोखरच महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंतच्या कारकिर्दीत पाकिस्तानचे दमदार नेतृत्व केले आहे आणि गेल्या वर्षीच्या विश्वचषकातील भारताविरुद्धची त्याची कामगिरी उल्लेखनीय होती. ICC रँकिंगनुसार आझम सध्या जगातील सर्वोत्तम टी२० फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत ७४ टी२० सामने खेळले आहेत आणि ४० पेक्षा जास्तीच्या सरासरीने २,६८६ धावा केल्या आहेत.

5 / 7

मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) - बाबर आझमने पाकिस्तान क्रिकेट संघाच्या फलंदाजीत चांगली भर घातली आहेच, पण त्याला महत्त्वाची साथ देणारा खेळाडू म्हणजे यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान. त्याच्या भागीदारीने पाक संघ आणखी मजबूत केला आहे. बाबरप्रमाणेच, रिझवाननेही पाकिस्तान संघातून खेळताना आतापर्यंत ५० टी-२० सामन्यांमध्ये ५०च्या सरासरीने १,६६२ धावा केल्या आहेत. सलामीच्या किंवा मधल्या फळीत फलंदाजी सांभाळण्यासाठी तो पाकिस्तानचा प्रमुख फलंदाज आहे.

6 / 7

हसन अली (Hasan Ali) - पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या अनुपस्थितीत, पाक क्रिकेट संघ स्पर्धेतील त्यांचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज हसन अलीवर खूप अवलंबून असेल. मुळात हसन अलीचा संघात समावेश नव्हता, पण जखमी मोहम्मद वसीमच्या जागी त्याचा समावेश करण्यात आला आहे. हसन आपल्या सर्व अनुभवाचा उपयोग पाकिस्तानच्या गोलंदाजीचा ताफ्याचे नेतृत्व करण्यासाठी करू शकतो. त्याने आतापर्यंत ४९ टी२० सामने खेळले असून त्याच्या नावावर ६० बळी आहेत.

7 / 7

नसीम शाह (Naseem Shah) - पाकिस्तान संघाच्या गोलंदाजी फळीतील एक वेगवान आणि युवा गोलंदाज म्हणजे नवोदित नसीम शाह. १९ वर्षांचा नसीम शाह हा पाकिस्तान संघाकडून कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. त्याला टी२० मध्ये अजून पदार्पण करायचे आहे. आशिया चषक ही त्याच्यासाठी उत्तम संधी असणार आहे. त्याने आतापर्यंत १३ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामने खेळले असून अनुक्रमे ३३ आणि १० बळी घेतले आहेत.

टॅग्स :एशिया कप 2022भारत विरुद्ध पाकिस्तानबाबर आजमभारतीय क्रिकेट संघ
Open in App