भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा हायव्होल्टेज सामना २३ फेब्रुवारीला दुबईच्या स्टेडियममध्ये रंगणार आहे. भारताने आपला पहिला सामना जिंकलाय तर पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागला आहे.
अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगणारा दुसरा सामना दोनही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. भारतीय संघ सध्या गुणतालिकेत पाकिस्तानपेक्षा वर असला तरीही हा सामना रंगतदार होणार यात दुमत नाही.
पहिला सामना जिंकल्याने मनोबल उंचावलेल्या टीम इंडियाला पाकिस्तानच्या एका स्टार खेळाडूपासून जपून राहावे लागणार आहे. पाकचा हा खेळाडू म्हणजे शाहीन शाह आफ्रिदी. त्याने याआधीही भारताला नाकीनऊ आणले आहेत.
भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपले सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामनाही याच मैदानावर खेळवला जाईल आणि येथे नेहमी वेगवान गोलंदाजांचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे.
भारत-बांगलादेश सामन्यातही मोहम्मद शमीने पाच, हर्षित राणाने तीन विकेट्स घेतल्या. त्यामुळे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन या मैदानावर भारतीय फलंदाजांच्या समोर कठीण आव्हान निर्माण करू शकतो.
आफ्रिदीकडे वेग, विविधता असे दोन्ही गुण आहेत. २०२१ T20 WC मध्ये त्याने रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली या तीन आघाडीच्या भारतीय फलंदाजांना माघारी धाडले होते. त्यामुळे आताही तो डोकेदुखी ठरू शकतो.