Join us  

Rohit Sharma, India vs Pakistan: "एक दिवस असा येईल की..."; रोहित शर्माचं पाकिस्तानच्या माजी कर्णधाराला सणसणीत प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 3:02 PM

Open in App
1 / 6

Rohit Sharma, India vs Pakistan: रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला ४-१ अशी मात दिली. रोहित कर्णधार झाल्यानंतर हा भारतीय संघाचा आठवा टी-२० मालिका विजय ठरला. वेस्ट इंडिजला मालिकेत शरणागती पत्करण्यास भाग पाडून भारताने पाच सामन्यांच्या मालिका जिंकली. आगामी काळात येणाऱ्या आशिया कप आणि टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने हा विजय खेळाडूंचे मनोधैर्य वाढवणारा विजय आहे.

2 / 6

मालिकेच्या चौथ्याच सामन्यात भारताने ३-१ आघाडी घेतली होती. त्यामुळे भारतीय संघाने पाचव्या आणि अंतिम सामन्यात रोहित शर्माला विश्रांती देत हार्दिक पांड्या कर्णधारपद सांभाळण्याची जबाबदारी दिली. हार्दिकने उत्तम नेतृत्व केले आणि भारतीय संघाला मोठा विजय मिळवून दिला. भारताने २० षटकात ७ बाद १८८ धावा केल्या तर विंडीजचा संघ १०० धावांतच बाद झाला व भारताने मोठा विजय मिळवला.

3 / 6

सातत्याने संघाचा कर्णधार बदलण्याच्या पॅटर्नवर पाकिस्तानी खेळाडूने नुकतीच टीका केली होती. 'रणनीतीचा विचार केला तर पाकिस्तानचा संघ सध्या भारतापेक्षा जास्त मजबूत संघ दिसतो. टीम इंडियाने एका वर्षात ७ कर्णधार बदलले आहेत. त्यांच्यासाठी संघाची बांधणी करणं खूपच कठीण होऊन बसणार आहे'; असं मत पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतिफ याने व्यक्त केलं होतं. त्याला रोहित शर्माने सणसणीत प्रत्युत्तर दिलं.

4 / 6

'मला या गोष्टीचं खूप अप्रूप वाटतं की एकाच संघात इतके कर्णधार तयार केले जात आहेत. कारण ही बाब खूपच छान आहे. नेतृत्वकौशल्य असणं ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आम्ही सारेच जण IPL खेळतो. त्यात आम्ही विविध संघातून खेळतो', असे रोहित म्हणाला.

5 / 6

'बरेचसे खेळाडू संघाचे नेतृत्व करतात. आधी आठ संघ खेळायचे पण आता तर IPL दहा संघांचे झाले आहे. त्यामुळे एक दिवस असा येईल की, टीम इंडियाच्या प्लेईंग ११ मध्ये दहा कर्णधारांचा समावेश असेल. एकाच संघात तब्बल १० कर्णधार खेळताना दिसले तर त्यात नवल वाटायला नको', असे सूचक विधान रोहित शर्माने केलं.

6 / 6

'एका संघात एका वेळी इतके कर्णधार खेळणं ही बाब चांगली की वाईट यावरून खूप चर्चा केली जाते. पण याबद्दल माझी भावना हीच आहे की असं झालं तर ते खूपच छान असेल. कारण अशा वेळी माझं काम खूप सोपं होईल. कारण सगळे खेळाडू आपापली भूमिका ओळखून योग्य पद्धतीने सामना खेळतील', असं मत रोहितने व्यक्त केले.

टॅग्स :रोहित शर्माभारत विरुद्ध पाकिस्तानभारतीय क्रिकेट संघहार्दिक पांड्या
Open in App