IND vs PAK T20 World Cup: भारत-पाकिस्तान दरम्यानही होऊ शकतो अंतिम सामना, जाणून घ्या समीकरण

IND vs PAK T20 World Cup: पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेवर मात करून 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता कायम ठेवली आहे.

IND vs PAK T20 World Cup: 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाची उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता कायम आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर गुरुवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने डकवर्थ लुईस नियमानुसार दक्षिण आफ्रिकेचा ३३ धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिकेवर पाकिस्तानच्या या विजयानंतर आता येत्या काही दिवसांत अशी समीकरणे तयार होऊ शकतात, ज्यात भारत आणि पाकिस्तान अंतिम सामना खेळतानादेखील दिसू शकतात.

भारतीय संघाला आपला अखेरचा सामना झिम्बाब्वेसोबत खेळायचा आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास भारतीय संघाचे एकूण आठ अंक होतील आणि प्रथम स्थानी राहत भारतीय संघ सेमीफायनलला पोहोचेल. जरी हा सामना पावसामुळे धुतला गेला तरीही भारतीय संघ सात अंकांसह सेमीफायनलला पोहोचेल.

पाकिस्तानचा अखेरचा सामना बांगलादेशसोबत आहे. पाकिस्तानच्या संघाला या सामन्यात बांगलादेशचा पराभव करावा लागेल. सोबतच दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँडदरम्यान होणाऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव व्हावा किंवा पावसामुळे हा सामना रद्द व्हावा अशी प्रार्थनाही करावी लागेल.

जर नेदरलँडच्या संघाने सामना जिंकला तर दक्षिण आफ्रिकेचे पाचच अंक राहतील. तसंच पावसामुळे हा सामना रद्द झाला, तर पाकिस्तानला बांगलादेशचा पराभव करत सेमीफायनलला पोहोचण्याची संधी आहे. अशा स्थितीत पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेचे सहा सहा अंक असले तरी दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत पाकिस्ताननं एक सामना अधिक जिंकलेला असेल.

आयसीसीच्या नियमानुसार दोन संघांमध्ये समान अंक असल्यास पहिले विजयाच्या संख्येवर विचार केला जोता. जर दोन्ही संघांनी तितकेच सामने जिंकले असतील नेच रनरेटनुसार निर्णय घेतला जातो.

दिलेल्या समीकरणानुसार सर्व काही जुळले तर भारत आणि पाकिस्तानचा संघ गट-2 मधून अनुक्रमे क्रमांक 1 आणि क्रमांक 2 मधून सेमीफायनलला पोहोचेल. अशा परिस्थितीत जिथे पाकिस्तानचा सेमीफायनलला न्यूझीलंडशी सामना होऊ शकतो, तिथे टीम इंडियाचा सामना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाशी होण्याची शक्यता आहे. जर भारत आणि पाकिस्तानच्या संघांनी सेमीफायनलमधील सामने जिंकले तर 13 नोव्हेंबरला भारत पाकिस्तान सामना पाहायला मिळू शकतो.

आत्तापर्यंत भारत आणि पाकिस्तान फक्त एकदाच T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आमनेसामने आले आहेत. 2007 च्या जोहान्सबर्ग येथे झालेल्या T20 विश्वचषकात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित 20 षटकात 5 बाद 157 धावा केल्या होत्या. भारताकडून गौतम गंभीरने 54 चेंडूत 75 धावांची शानदार खेळी केली. गंभीरशिवाय रोहित शर्माने शेवटच्या षटकात नाबाद 30 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली.

प्रत्युत्तरात पाकिस्तानी संघाने 77 धावांत आपले 6 विकेट गमावल्या. पण पुन्हा एकदा मिसबाह-उल-हक (43 धावा) भारतीय गोलंदाजांसाठी अडचणीचा ठरला होता. मिसबाहच्या शानदार फलंदाजीमुळे पाकिस्तानला शेवटच्या चार चेंडूत सहा धावा करायच्या होत्या. मात्र जोगिंदर शर्माने मिस्बाहला श्रीशांतच्या हाती झेलबाद करून भारताला जबरदस्त विजय मिळवून दिला होता.