Join us  

Virat Kohli, India vs Pakistan: विराट कोहलीला Asia Cup 2022 मध्ये खुणावतंय अनोखं शतक; गांगुली अन् पोलार्डचा विक्रम मोडण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2022 3:03 PM

Open in App
1 / 6

Virat Kohli, India vs Pakistan: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची बॅट गेल्या अडीच वर्षांपासून शांत आहे. मोठी धावसंख्या करण्यासाठी विराट झगडताना दिसतोय. भारतीय संघातील इतर नवख्या आणि अनुभवी खेळाडूंच्या जोरावर टीम इंडियाची कामगिरी उंचावताना दिसते, पण विराटला मात्र अपेक्षित यश काही केल्या मिळत नाहीये.

2 / 6

आशिया कपच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान विरूद्ध विराटला चांगली सुरूवात मिळाली. पण आव्हानाचा पाठलाग करताना तो ३५ धावांवर माघारी परतला. त्यानंतर गेल्या सामन्यात त्याने हाँगकाँग संघाविरुद्ध ५९ धावांची दमदार खेळी खेळली होती, मात्र तुलनेने दुबळ्या संघाविरूद्ध ही खेळी असल्याने चाहत्यांना फारसे समाधान वाटले नाही. तसेच, त्याला अद्याप शतकही झळकावता आलेले नाही.

3 / 6

हाँगकाँग हा जरी भारतासमोर दुबळा संघ असला तरी शेवटच्या डावापासून चाहत्यांना आशा आहे की कोहलीच्या बॅटमधून लवकरच शतक पाहायला मिळेल. या दरम्यान चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे कोहलीची बॅट जरी शतक झळकावत नसली, तरी त्याला एका अनोख्या आणि वेगळ्याच शतकाची संधी आहे. या अनोख्या विक्रमाच्या तो अगदी जवळ पोहोचला आहे.

4 / 6

Asia Cup 2022 मध्ये विराट कोहलीला आज (४ सप्टेंबर) पाकिस्तानविरुद्ध सामना खेळायचा आहे. या सामन्यात कोहलीने केवळ ३ षटकार मारले तर तो टी२० आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये षटकारांचे शतक पूर्ण करेल. अशाप्रकारे तो वेस्ट इंडिजचा किरॉन पोलार्ड आणि ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल यांनाही मागे टाकेल. पोलार्ड आणि मॅक्सवेल यांनी आतापर्यंत प्रत्येकी ९९ षटकार मारले आहेत.

5 / 6

इतकेच नव्हे तर, कोहली टी२० आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये षटकारांचे शतक ठोकणारा दुसरा भारतीय ठरेल. या यादीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या आघाडीवर आहे. तो जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक टी२० षटकार (१६५) ठोकणारा फलंदाज आहे. न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल टी२० षटकारांच्या बाबतीत १७२ षटकारांसह अव्वल आहे. त्यामुळे रोहितने आज झंझावाती खेळी केली, तर त्यालाही गप्टिलचा विक्रम मोडण्याची संधी आहे.

6 / 6

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही कोहलीने आतापर्यंत ४६५ सामन्यांमध्ये २४६ षटकार मारले आहेत. आज पाकिस्तान विरुद्ध कोहलीने आणखी दोन षटकार मारले तर तो माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅरॉन फिंचला मागे टाकेल. या दोघांनीही २४७ षटकार मारले आहेत. तसेच, कोहलीने आज ६ षटकार मारले तर तो युवराज सिंगला (२५१) देखील मागे टाकू शकेल.

टॅग्स :एशिया कप 2022विराट कोहलीरोहित शर्माभारतीय क्रिकेट संघ
Open in App