पाकिस्तान विरूद्ध विराटची 'अग्निपरीक्षा'; 2015 पासून सुरू असलेला १८ सामन्यांचा दुष्काळ संपणार?

विराट दमदार फॉर्मात असला तरी गेल्या ८ वर्षात त्याला एक मोठी गोष्ट जमलेली नाही

Virat Kohli, IND vs PAK World Cup 2023: विश्वचषकाचा हाय व्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात शनिवारी १४ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर मोठी जबाबदारी असेल.

टीम इंडिया शानदार फॉर्ममध्ये आहे. महत्त्वाचे दोन्ही खेळाडू उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. रोहितने गेल्या सामन्यात शतक झळकावले होते. तर विराटने गेल्या दोन सामन्यात अर्धशतके झळकावली आहेत.

विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८५ धावा करून बाद झाला. अफगाणिस्तानविरुद्ध त्याने ५५ धावांची नाबाद खेळी केली. अशा परिस्थितीत विराट कोहली आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत पाकिस्तान विरूद्ध मोठी खेळी खेळेल अशी अपेक्षा आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या विराट कोहलीला विश्वचषकात केवळ २ शतके झळकावता आली आहेत. त्याला पाकिस्तानविरुद्धच्या १८ डावांचा दुष्काळ संपवायचा आहे.

विराट कोहलीने 2011 मध्ये पहिला विश्वचषक सामना खेळला होता. त्यात बांगलादेशविरुद्ध शतक केले. त्यानतंर 2015 मध्ये पाकिस्तान विरुद्ध शतक ठोकले. तेव्हापासून आजपर्यंत कोहलीला वनडे विश्वचषकात शतकाची प्रतीक्षा आहे.

2015 च्या विश्वचषकामध्ये विराटने 8 सामन्यात 305 धावा केल्या. तसेच 2019 च्या विश्वचषकात त्याने 9 सामन्यात 443 धावा केल्या. पण त्याला शतक झळकावता आले नाही.

आता अहमदाबादमध्ये खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक आहे. अशा खेळपट्टीवर विराट कोहली 18 डावांचा दुष्काळ संपवू शकतो अशी साऱ्यांनाच अपेक्षा आहे. त्यातही पाकिस्तान विरूद्ध विराटचे शतक आल्यास चाहते अधिक खुश होतील हे नक्की.