IND vs SA 1st T20I Live : KL Rahulची माघार, इशान किशनसह सलामीला कोण उतरणार?; भारताची Playing XI अशी असणार!

India vs South Africa 1st T20I Live : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पाच ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे.

India vs South Africa 1st T20I Live : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पाच ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पण, या सामन्याला सुरूवात होण्याआधी भारताला दोन मोठे धक्के बसले आहेत. लोकेश राहुल ( KL Rahul) आणि कुलदीप यादव ( Kuldeep Yadav) यांनी दुखापतीमुळे मालिकेतून माघार घेतली आहे.

त्यामुळे रिषभ पंत ( Rishabh Pant) या मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळणार आहे, तर हार्दिक पांड्याला उप कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नेट्समध्ये फलंदाजी करताना कुलदीपच्या हाताला दुखापत झाली. लोकेश व कुलदीप दोघंही आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसनासाठी दाखल झाले आहेत.

भारतीय संघाने आतापर्यंत सलग 12 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत आणि त्यांनी अफगाणिस्ता व रोमानिया यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानला नमवून टीम इंडियाने वर्ल्ड रेकॉर्डचा पाया रचला. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने 12 पैकी 9 सामने जिंकले आणि आता रिषभच्या नेतृत्वाखाली विश्व विक्रमाची नोंद होण्याची संधी आहे.

पण, लोकेशच्या माघारीमुळे आजच्या सामन्यात इशान किशन व ऋतुराज गायकवाड हे सलामीला खेळणे निश्चित झाले आहे. लोकेशच्या जागी संघात दीपक हुडा किंवा दिनेश कार्तिक यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. कार्तिकचा फॉर्म पाहता त्याचे पारडे जड आहे.

हार्दिक पांड्या सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे. उम्रान-आवेश-अर्षदीप यापैकी तिसऱ्या जलदगती गोलंदाजासाठी एकाची निवड होणार आहे. भुवनेश्वर कुमार व हर्षल पटेल हे दोन जलदगती गोलंदाज संघात पक्के आहेत. राहुल द्रविडच्या मते उम्रान मलिक अजून परिपक्व झालेला नाही. त्यामुळे आवेश किंवा अर्षदीप यांच्यापैकी एकाला संधी नक्की मिळेल.

बघा आजच्या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असणार - इशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान/अर्षदीप सिंग, युजवेंद्र चहल