IND vs SA, 2nd Test, Shardul Thakur : 'लॉर्ड' शार्दूल पावला; ३८ धावांत दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ गुंडाळला, मोठा विक्रम नोंदवला

India vs South Africa, 2nd Test Live Updates : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ३७व्या षटकापर्यंत एकही षटक न फेकलेल्या शार्दूल ठाकूरनं ( Shardul Thakur) दुसऱ्या दिवशी कमाल केली.

India vs South Africa, 2nd Test Live Updates : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ३७व्या षटकापर्यंत एकही षटक न फेकलेल्या शार्दूल ठाकूरनं ( Shardul Thakur) दुसऱ्या दिवशी कमाल केली. त्यानं आफ्रिकेचा निम्मा संघ माघारी पाठवताना टीम इंडियाला सामन्यात पुनरागमन मिळवून दिलं. कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच शार्दूलनं डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.

भारताच्या २०२ धावांच्या प्रत्युत्तरात उतरलेल्या आफ्रिकेला मोहम्मद शमीनं चौथ्या षटकात सलामीवीर एडन मार्कराम ( ७) याला बाद करून धक्का दिला. कर्णधार डीन एल्गर व किगन पीटरसन यांनी सावध खेळ केला. दुसऱ्या दिवशीही ही जोडी फॉर्मात दिसत होती. त्यांची २११ चेंडूंतील ७४ धावांची भागीदारी शार्दूल ठाकूरनं संपुष्टात आणली. डीन एल्गर २८ धावांवर ( १२० चेंडू) बाद झाला. पीटरसननं पहिले अर्धशतक पूर्ण करताना संघाला शंभरी पल्ला पार करून दिला. शार्दूलनं त्यानंतर पीटरसन ( ६२ ) व रॅसी व्हॅन डेर ड्युसन ( १) यांना माघारी पाठवलं.

ड्युसनची विकेट वादात अडकली आहे. चेंडू रिषभ पंतच्या ग्लोव्ह्जमध्ये विसावण्यापूर्वी जमिनीवर टप्पा पडल्याचे रिप्लेत दिसले. ड्युसनही रिप्ले पाहण्यापूर्वी मैदानाबाहेर गेला. पण, नियमानुसार पुढील चेंडू टाकेपर्यंत अम्पायर त्यांचा निर्णय बदलू शकत होते, परंतु त्यांनी निर्णय कायम राखला.

आफ्रिकेची अवस्था ४ बाद १०२ अशी झाली होती. पण, टेम्बा बवुमा व कायले वेरेयन यांनी टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली. त्यांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना आफ्रिकेला आघाडीच्या दिशेनं नेलं. पण, पुन्हा एकदा शार्दूल धावला. त्यानं वेरेयनला ( २१) पायचीत पकडले. आफ्रिकेचा निम्मा संघ १६२ धावांवर माघारी परतला.

त्यानंतर बवुमानं आक्रमक खेळ करण्यास सुरूवात करताना आर अश्विनचा चौकार व खणखणीत षटकार लगावला. त्यानं शार्दूलला चौकार खेचून अर्धशतक पूर्ण केले, परंतु पढच्याच चेंडूवर शार्दूलनं त्याला तंबूची वाट दाखवली. ५१ धावांवर बवुमाचा यष्टिंमागे रिषभनं सुरेख झेल टिपला.

शार्दूलनं ६८ चेंडूंत पाच विकेट्स घेतल्या. सध्याच्या संघातील जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांच्यानंतर जोहान्सबर्गवर डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम शार्दूलनं केला. येथे डावात पाच विकेट्स घेणारा तो सहावा भारतीय गोलंदाज ठरला आहे. अनिल कुंबळे ( १९९२), जावगल श्रीनाथ ( १९९७), एस श्रीसंथ ( २००६) यांनीही हा पराक्रम केला आहे.

मयांक अग्रवाल ( २६), चेतेश्वर पुजारा ( ३) व अजिंक्य रहाणे ( ०) हे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर लोकेश राहुलनं हनुमा विहारीसह डाव सावण्याचा प्रयत्न केला. पण, विहारी ( २०) धावांवर माघारी परतला अन् लोकेशही ( ५०) अर्धशतकानंतर बाद झाला. त्यानंतर आर अश्विन व रिषभ पंत यांनी चांगला खेळ केला, परंतु रिषभला फार काळ खेळपट्टीवर टीकता आले नाही. अश्विननं मात्र ५० चेंडूंत ४६ धावा चोपल्या. जसप्रीतनं नाबाद १४ धावा करून संघाला २०२ धावांपर्यंत पोहोचवले.