IND vs SA 3rd T20I : रिषभ पंत ओपनर, मधल्या फळीतही बदल; पाहा तिसऱ्या ट्वेंटी-२०त भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल

India vs South Africa 3rd T20I :तिसरा सामना इंदूर येथे होणार आहे आणि त्याआधी विराट कोहली व लोकेश राहुल यांना विश्रांती दिल्याचे वृत्त समोर आले आहे.

India vs South Africa 3rd T20I : भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका गुवाहाटी येथेच खिशात घातली. दुसऱ्या ट्वेंटी-२०त १६ धावांनी विजय मिळवून भारताने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना इंदूर येथे होणार आहे आणि त्याआधी विराट कोहली व लोकेश राहुल यांना विश्रांती दिल्याचे वृत्त समोर आले आहे.

विराट कोहली ( Virat Kohli) गुवाहाटी येथून थेट मुंबईत दाखल झाला आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी त्याने तीन दिवसांची सुट्टी घेतलीय आणि तो कुटुंबियांसोबत राहणार आहे. विराटसह सलामीवीर लोकेश राहुल ( KL Rahul) यालाही विश्रांती दिल्याचे वृत्त समोर आले आहे. लोकेशने आफ्रिकेविरुद्ध दोन सामन्यांत ५१* व ५७ धावांची खेळी करून विजयात मोठा वाटा उचलला आहे.

ऑस्ट्रेलिया व आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, हार्दिक पांड्या यांची कामगिरी चांगली झालेली पाहायला मिळाली. श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज व उमेश यादव यांना आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत संधी मिळालेली नाही. त्यामुळे आता मालिका जिंकल्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल पाहायला मिळू शकतो.

आघाडीची फळी चांगली कामगिरी करत आहे, तर दिनेश कार्तिक दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडतोय. रिषभ पंतला अद्याप संधी मिळालेली नाही. आशिया चषक स्पर्धेनंतर रिषभ तीन सामने प्लेइंग इलेव्हनमध्ये होता, पंरतु त्याला फलंदाजीची संधीच मिळाली नाही.

विराट व लोकेशला विश्रांती दिल्याने तिसऱ्या सामन्यात रिषभ पंत व रोहित शर्मा ही जोडी सलामीला येण्याची शक्यता आहे. मधल्या फळीत श्रेयस अय्यरला आजमावले जाऊ शकते. गोलंदाजी विभागात हर्षल पटेल किंवा अर्शदीप सिंग यांच्याजागी मोहम्मद सिराजला आणि आर अश्विन व युजवेंद्र चहल पुन्हा सोबत दिसतील.

संभाव्या प्लेइंग इलेव्हन - रिषभ पंत, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, आर अश्विन, युजवेंद्र चहल, दीपक चहर, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल/ मोहम्मद सिराज.