IND Vs SA : "पुजाराची कामगिरी अशीच राहिली, तर लवकरच त्याला बेंचवर बसवलं जाईल"

South Africa vs India: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पुजारा पहिल्या डावात शून्यवर बाद झाला होता.

South Africa vs India Test Cheteshwar Pujara: सेंच्युरियनमधील पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यानंतर टीम इंडिया आता पुढील विजयाच्या तयारीत आहे. सोमवारपासून जोहान्सबर्ग येथे दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

पण दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वीच माजी सिलेक्टर शरणदीप सिंग यांनी टीम इंडियाचा फलंदाज चेतेश्वर पुजारासाठी धोक्याचा इशारा दिला आहे. सेंच्युरियन कसोटीत पुजाराला पहिल्या डावात ० आणि दुसऱ्या डावात १६ धावाच करता आल्या होत्या.

"आपल्या टीमचा फलंदाजी विभागाची कामगिरी चांगली नाहीये. केवळ केएल राहुल हा एकमेव फॅक्टर आहे आणि केवळ आपण केएल राहुल, विराटवर अवलंबून राहू शकत नाही. परंतु मी या ठिकाणी केवळ पुजाराच्या बाबतीत बोलू इच्छितो," असं ते म्हणाले.

"आता चेतेश्वर पुजाराला चांगली कामगिरी दाखवावी लागेल आणि धावा कराव्या लागतील. आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात शतक ठोकणारा श्रेयस अय्यरही संघात स्थान मिळण्याची संधी शोधत आहे," असंही त्यांनी नमूद केलं.

"पुजारा एक सीनिअर खेळाडू आहे. जर त्याची कामगिरी अशीच राहिली, तर त्याला लवकरच बेंचवर बसवलं जाईल." असा इशाराही शरणदीप सिंग यांनी दिला.

भारतीय संघ खूप चांगली कामगिरी करत असून, संघ मालिका जिंकेल असा मला विश्वास आहे. यजमान संघ मालिका जिंकण्यासाठी नाही तर केवळ खेळण्यासाठी मालिका खेळत असल्याचे स्पष्ट झालं आहे, असंही ते म्हणाले.

दक्षिण आफ्रिकेच्या संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी कमकुवत आहे. आता दुसऱ्या कसोटीत क्विंटन डी कॉक कसोटीचा भाग नसल्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या फलंदाजी विभागावरही होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.

आपला गोलंदाजी विभाग अधिक चांगली कामगिरी करत आहे. इशांतच्या आधी आपण सिराजला इलेव्हनमध्ये खेळवत आहोत, त्यावरुन त्याची कामगिरी किती चांगली आहे हे दिसून येतंय असंही त्यांनी नमूद केलं.

यावेळी शरणदीप यांनी बुमराहच्या नावाचाही उल्लेख केला. "तो आपल्यासाठी मास्टरपिस आहे. तो ज्याप्रकारे गोलंदाजी करतो, ती अतिशय उत्तम आहे. भारत निश्चितच ही मालिका जिंकेल याचा मला विश्वास आहे," असंही ते म्हणाले.