IND vs SA ODI Team : फिटनेस की काही वेगळं कारण?; चीफ सिलेक्टर्सनी सांगितलं रोहित शर्माला वन डे मालिकेसाठी न निवडण्यामागचं खरं कारण

IND vs SA ODI Team : निवड समितीनं दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील वन डे मालिकेसाठी शुक्रवारी संघ जाहीर केला.

IND vs SA ODI Team : निवड समितीनं दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील वन डे मालिकेसाठी शुक्रवारी संघ जाहीर केला. रोहित शर्मा ( Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखालील ही पहिलीच वन डे मालिका असल्यानं त्याच्या चाहत्यांना उत्सुकता होती. पण, निवड समितीनं रोहितला या दौऱ्यापासून दूर ठेवलं अन् टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी लोकेश राहुलच्या ( KL Rahul) खांद्यावर सोपवली.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघ जाहीर करण्यात आला, तेव्हा बीसीसीआयनं यापुढे वन डे संघाचा कर्णधार रोहित असेल हे जाहीर केले होते. या घोषणेनंतर आफ्रिका दौऱ्यावर रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया वन डे मालिका खेळणार होती. पण, आता रोहितच्या फॅन्सना वाट पाहावी लागणार आहे.

लोकेश राहुलकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवताना निवड समितीनं जसप्रीत बुमराहला उप कर्णधार बनवलं. रोहितच्या अनुपस्थितीत ऋतुराज गायकवाडला सलामीला खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता बळावली आहे. शिखर धवनसाठी ही अखेरची संधी असेल.

रोहित शर्माचे या मालिकेत नसण्यामागे दुखापत हेच कारण आहे. तो अजूनही पूर्णपणे बरा झालेला नाही. पण, आगामी महत्त्वाच्या मालिका आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेऊन रोहितला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी मैदानावर न उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला.

निवड समिती प्रमुख चेतन शर्मा यांनी सांगितले की, पुढे महत्त्वाच्या स्पर्धा आहेत आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कपही होणार आहे. त्यामुळे रोहितला NCAत कायम ठेऊन तंदुरूस्तीवर काम करण्यास वेळ मिळावा, म्हणून आम्ही त्याची या मालिकेसाठी निवड केली नाही.

ते पुढे म्हणाले, क्रिकेट मालिकांची संख्या वाढली आहे. कोणताच खेळाडू दुखापतग्रस्त होऊ इच्छित नाही. सर्वांना खेळायचे आहे. कोणी मुद्दाम दुखापतग्रस्त होत नाही. त्यामुळेच रोहितला या मालिकेत खेळण्यापासून रोखले गेले आहे. पुढे वर्ल्ड कप आणि अनेक महत्त्वाच्या मालिका आहेत.

भारताचा संघ- केएल राहुल (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज