टीम इंडियाच्या मेन्यूमध्ये ज्वारी-बाजरीची भाकरी अन् आफ्रिकेच्या खेळाडूंची मागणी तर ऐका!

भारत आणि द.आफ्रिका यांच्यात आज कटक येथे दुसरा टी-२० सामना खेळवला जाणार आहे. पण या सामन्याआधी खेळाडूंच्या जेवणाच्या मेन्यूची जोरदार चर्चा होत आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघानं २११ धावांचा डोंगर उभारला. तरीही द.आफ्रिकेनं सहज आव्हान पार करत भारताला पराभवाचा धक्का दिला.

पाच सामन्यांच्या मालिकेत आता द.आफ्रिकेनं १-० ने आघाडी घेतली आहे. रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज कटकमध्ये दुसरा सामना खेळत आहे. दोन्ही संघाचे खेळाडू भुवनेश्वरच्या मेफेयर हॉटेलमध्ये थांबले आहेत.

हॉटेल व्यवस्थापनानं खेळाडूंच्या जेवणाची खास तयारी केली आहे. मेन्यूमध्ये हाय प्रोटिन आणि कार्बोहायड्रेट पदार्थांची खास काळजी घेण्यात आली आहे. मैदानात जास्तवेळ खेळाडूंची ऊर्जा कायम राहावी यासाठी आहारावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे.

भारतीय खेळाडूंसाठी विशेषत: शाकाहारी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंच्या मेन्यूमध्ये बिल्टोंग, बोएरवोर्स, बोबोटी, पोटजीकोस (पॉट फूड), ग्रिल्ड अँड रोस्टेड लॅम्ब अशा मांसाहारी पदार्थांचा समावेश आहे.

हॉटेल मेफेयरच्या स्टाफनं दिलेल्या माहितीनुसार फाइव्ह स्टार हॉटेल असल्यामुळे मेन्यूमध्ये खूप पर्याय उपलब्ध आहेत. खेळाडूंच्या प्रकृती काळजी घेत मेन्यूमध्ये सूप, सॅलड, लाइव्ह काऊंटर, जपानी आणि भारतीय जेवणाची व्यवस्था केली आहे.

यासोबतच बदाम आणि सोया दूध, मल्टीग्रेन बन्स, फ्रेश ज्यूस आणि विविध फळांची व्यवस्था केली आहे. ग्रोनोला बार आणि ग्लूटेन-फ्री स्नॅक्सचा देखील समावेश आहे. तसंच बाजरी आणि ज्वारीच्या भाकरीचाही बेत जेवणात ठेवण्यात आला आहे.

जेवणात गोड म्हणून छेना पोडा आणि बेक्ड रसगुल्ले देखील असणार आहेत.

ओडिशा पर्यटन विभागाचे कर्मचारी अंशुमन रथ म्हणाले की, हॉटेलमध्ये बहुतांश ओडिशाचे खास पदार्थ दिले जात आहेत हे जाणून खूप आनंद झाला. खेळाडूंचा एक वेगळा चाहता वर्ग इथं आहे. त्यामुळे राज्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या नक्कीच वाढेल.

भुवनेश्वर येथे अतिशय विनम्रपणे आणि शानदार स्वागत झाल्याचं द.आफ्रिकेच्या खेळाडूंनी सांगितलं. "इथं येऊन खूप छान वाटत आहे. आमचं खूप आदरानं स्वागत करण्यात आलं. भारताच्या दोन गोष्टी खूप छान आहेत. एक म्हणजे क्रिकेट आणि दुसरं पाहुण्याचं आदरातिथ्य", असं द.आफ्रिकेचा खेळाडू पार्नेल म्हणाला.