IND vs SL, 1st ODI Live : जिंकलंस भावा! ९८ धावांवर दासून शनाका होता बाद, पण रोहितने अपील घेतली मागे अन्...

India vs Sri Lanka, 1st ODI Live : भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात ६७ धावांनी विजय मिळवताना श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पण, या सामन्याच्या ५०व्या षटकात रोहित शर्माच्या कृतीने जिंकलं मन...

भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात ६७ धावांनी विजय मिळवताना श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. विराट कोहलीचे शतक, रोहित शर्मा व शुभमन गिल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर भारतीय गोलंदाज उम्रान मलिक, मोहम्मद सिराज यांनी आपली कामगिरी चोख बजावली.

विराट कोहलीने ( Virat Kohli Century) आज वन डे क्रिकेटमधील ४५ वे शतक झळकावताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे विक्रम मोडले. विराटने ८७ चेंडूंत १२ चौकार व १ षटकारांसह ११३ धावा केल्या. विराटचे सोडलेले दोन झेल श्रीलंकेला महागात पडले.

शुभमन आणि रोहित शर्मा यांनी १४३ धावांची सलामी दिली. शुभमन ६० चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीने ७० धावांवर, तर रोहित ६७ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ८३ धावांवर माघारी परतला. सचिनने वन डे क्रिकेटमध्ये ४५ शतकांसाठी ४२४ इनिंग्ज खेळल्या, विराटने २५७ इनिंग्जमध्ये हा पराक्रम केला. भारताने ७ बाद ३७३ धावांचा डोंगर उभा केला.

मोहम्मद सिराजने अविष्का फर्नांडो व कुसल मेंडिसला बाद केले. सलामीवीर पथूम निसंका आणि चरिथ असलंका यांनी श्रीलंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु उम्रान मलिकच्या वेगासमोर तेही नतमस्तक झाले. चरिथ २३ धावांवर उम्रानच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

निसंका व धनंजया डी सिल्वा या जोडीने भारताची डोकेदुखी वाढवली. निसंकाने अर्धशतक झळकावताना ७२ धावांची भागीदारी केली. मोहम्मद शमीने अनुभव कामी आणताना धनंजयाला ( ४७) बाद केले. उम्रानच्या वेगवान गोलंदाजीवर फटका मारण्याचा निसंकाचा प्रयत्न फसला अन् अक्षर पटेलने सोपा झेल घेतला. निसंका ८० चेंडूंत ११ चौकारांसह ७२ धावांवर बाद झाला.

वनिंदू हसरंगाने फिरकीपटू युझवेंद्र चहलला टार्गेट केले अन् ६ ,६,४ अशा धावा कुटल्या. पण, चहलने गुगली टाकून वनिंदूला आणखी एक उंच फटका मारण्यास भाग पाडले. श्रेयस अय्यर व उम्रान झेल टिपण्यासाठी समोरासमोर आले, परंतु अय्यरने चेंडूवर नजर कायम राखताना झेल टिपला. वनिंदू ७ चेंडूंत १६ धावा करून माघारी परतला.

कर्णधार दासून शनाकाने संघर्ष दाखवताना शतक पूर्ण केले. परंतु श्रीलंकेला हार मानावी लागली. त्यांनी ८ बाद ३०६ धावांपर्यंत मजल मारली. शनाकाने ८८ चेंडूंत १२ चौकार व ३ षटकारांसह नाबाद १०८ धावा केल्या. ५०व्या षटकात शनाकाला शतक पूर्ण करण्यासाठी ५ धावा हव्या होत्या.

मोहम्मद शमीच्या पहिल्या चेंडूवर शनाकाने दोन धावा घेतल्या. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतल्याने कसून रजिथा स्ट्राईकवर आला. शमी चौथा चेंडू टाकणार तोपर्यंत शनाका नॉन स्ट्राईक एंडवर क्रिज सोडून पुढे गेला होता. शमीने त्याला रन आऊट केले अन् अपील केले.

अम्पायर नितिन मेनन यांनी तिसऱ्या अम्पायरचा सिग्नल दिला, परंतु रोहित पळत आला अन् अपील मागे घेतले. त्यानंतर रजिथाने एक धाव घेत शनाकाला स्ट्राईक दिली अन् श्रीलंकेच्या कर्णधाराने शतक पूर्ण केले. रोहितच्या या कृतीने मात्र चाहत्यांचे मन जिंकले. ''शनाका ९८ धावांवर होता आणि अशा प्रकारे त्याने बाद होऊ नये अशी आमची इच्छा होती. त्यामुळे अपील मागे घेतली,'' असे रोहित म्हणाला