Join us  

IND vs SL 1st T20I Live Updates : मला भारतीय संघाला आव्हानात्मक परिस्थितीत ठेवायचे होते, कारण...; असं का म्हणाला हार्दिक पांड्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 11:18 PM

Open in App
1 / 8

श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि गोलंदाजांनी चांगली कामगिरीही करून दाखवली. पदार्पणवीर शुभमन गिल ( ७), सूर्यकुमार यादव ( ७) व संजू सॅमसन ( ५) हे माघारी परतले. इशान किशनने कर्णधार हार्दिक पांड्यासह त्याने ३१ धावांची भागीदारी केली. पण, तो ३७ धावांवर ( ३ चौकार व २ षटकार) माघारी जावे लागले. हार्दिक २९ धावांवर यष्टीरक्षकाच्या हाती तो झेल देऊन माघारी परतला.

2 / 8

१६व्या षटकात दीपक हुडाने गिअर बदलला अन् थिक्सानाला सलग दोन षटकार खेचून चाहत्यांमध्ये ऊर्जा फुंकली. दीपक हुडा व अक्षर पटेल यांनी अखेरच्या पाच षटकांत फटकेबाजी केली. अक्षरने २० चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह नाबाद ३१ धावा केल्या, तर दीपकने २३ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारासह नाबाद ४१ धावा केल्या. या दोघांनी ३५ चेंडूंत ६८ धावांची भागीदारी केली आणि भारताने ५ बाद १६२ धावांपर्यंत मजल मारली.

3 / 8

पदार्पणवीर शिवम मावीने दुसऱ्या षटकात पथुम निसंकाला ( १) व चौथ्या षटकात धनंजया सिल्वाला ( ८) बाद केले. चमिका असलंका व कुसल मेंडिस यांनी श्रीलंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. उम्रान मलिकच्या वेगवान चेंडूवर पुल मारण्याचा चमिकाचा ( १२) प्रयत्न फसला अन् यष्टीरक्षक इशान किशनने फाईन लेग बाऊंड्रीच्या दिशेने धाव घेत अप्रतिम झेल टिपला.

4 / 8

पुढच्याच षटकात हर्षल पटेलने श्रीलंकेला मोठा धक्का दिला अन् कुसल २८ धावांवर बाद झाला. पटेलच्या षटकात भानुका राजपक्षाचा ( १०) झेल हार्दिकने टिपला, परंतु त्याच्या पाय मुरगळला आणि त्याला मैदानाबाहेर जावे लागले. सूर्यकुमार यादव नेतृत्व करताना दिसला. १५व्या षटकात हार्दिक पुन्हा मैदानावर क्षेत्ररक्षणासाठी आला. शिवम मावीच्या गोलंदाजीवर हार्दिकने श्रीलंकेच्या वनिंदू हसरंगाचा ( २१) झेलही टिपला.

5 / 8

दासून शनाका दमदार फटकेबाजी करत होता आणि वानखेडे स्टेडियमवर स्मशान शांतता पसरली होती. श्रीलंकेला २१ चेंडूंत ३४ धावा हव्या होत्या आणि शनाका चांगला खेळत होता. उम्रान मलिकने १७व्या षटकात भारताला ही महत्त्वाची विकेट मिळवून दिली. २७ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ४५ धावा करणारा शनाकाला चहलच्या हाती झेल देऊन माघारी फिरावे लागले.

6 / 8

उम्रानने २७ धावा देत २ विकेट्स घेतल्या. शिवमने पदार्पणाच्या सामन्यात २२ धावांत ४ विकेट्स घेत प्रभाव पाडला. प्रग्यान ओझा ( ४/२१) आणि बरींदर सरन ( ४/१०) यांनी अनुक्रमे २००९ व २०१६ मध्ये पदार्पणात ट्वेंटी-२०त चार विकेट्स घेतल्या होत्या. श्रीलंकेच्या चमिका करुणारत्नेने अखेरपर्यंत संघर्ष केला. हर्षल पटेलने टाकलेल्या १९व्या षटकात १३ धावा आल्या अन् श्रीलंकेला ६ चेंडूंत विजयासाठी १३ धावा करायच्या होत्या.

7 / 8

अक्षर पटेलला अखेरचे षटक दिले अन् पहिल्या दोन चेंडूवर दोन धावा आल्यानंतर तिसरा चेंडू सीमापार पाठवला. करुणारत्नेला ३ चेंडूंत ५ धावा करायच्या होत्या. १ चेंडूंत ४ धावा असा सामना आला अन् करुणारत्नेच स्ट्राईकवर होता. पण, तो अपयशी ठरला अन् भारताने २ धावांनी सामना जिंकला. श्रीलंकेचा संघ १६० धावांत तंबूत परतला. करुणारत्ने १६ चेंडूंत २३ धावांवर नाबाद राहिला.

8 / 8

हार्दिक पांड्या म्हणाला, भारतीय संघाचा कर्णधार म्हणून ऐकण्याची मला आता सवय झाली आहे. माझा पाय मुरगळला होता, परंतु मी ठिक आहे. मी हसतोय म्हणजे सर्वकाही व्यवस्थित आहे, हेच समजा. आम्ही कदाचित हा सामना गमावला असता आणि ते ठिकही होते. युवा खेळाडूंनी या सामन्यात पुनरागमन करून दिले. शिवम मावीला आयपीएलमध्ये गोलंदाजी करताना मी पाहिले आहे आणि आज त्याला मी तशीच कामगिरी कर असे सांगितले. तू जास्त धावा दिल्यास तरी मी तुझ्या पाठिशी उभा आहे, असा विश्वास मी त्याला दिला. मला भारतीय संघाला आव्हानात्मक परिस्थितीत टाकायचे होते, कारण मोठ्या सामन्यांसाठी हा अनुभव उपयोगी येणार आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाहार्दिक पांड्या
Open in App