IND vs SL 2nd T20I Live : माझा निर्णय नव्हे, तर या चुकांमुळे हरलो! पराभवानंतर हार्दिक पांड्या वाचा काय म्हणाला, अर्शदीपबाबतही केलं विधान

India vs Sri Lanka 2nd T20I Live : आशियाई विजेत्या श्रीलंकेने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात भारतावर १६ धावांनी विजय मिळवला अन् मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. नाणेफेक जिंकूनही प्रथम गोलंदाजीचा हार्दिक पांड्याचा निर्णय हा अनेकांना पचलेला नव्हता. सामन्यानंतर हार्दिकने पराभवाचे खापर मात्र दुसऱ्याच गोष्टीवर फोडले.

कुसल मेंडिस ( ५२) व दासून शनाका ( ५६*) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेने ६ बाद २०६ धावा केल्या. अक्षरने २४ धावांत २, चहलने ३० धावांत १ विकेट घेतली. उम्रानने ४३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. अर्शदीपने २ षटकांत ३७ धावा दिल्या. शिवम मावीने ४ षटकांत ५३ धावा दिल्या.

इशान किशन ( २), शुबमन गिल ( ५), पदार्पवीर राहुल त्रिपाठी ( ५) , हार्दिक पांड्या ( १२) आणि दीपक हुडा ( ९) आज अपयशी ठरल्याने भारताची अवस्था ५ बाद ५७ अशी दयनीय झाली होती. सूर्यकुमार आणि अक्षर या जोडीने भारतीयांना आशेचा किरण दाखवला. या दोघांनी ९१ धावांची भागीदारी केली.

श्रीलंकेच्या दोनशेपार धावांच्या प्रत्युत्तरात भारताची आघाडीची फळी ढेपाळली. ५७ धावांत ५ फलंदाज माघारी परतल्यानंतर भारतीय चाहत्यांनी कमबॅकच्या आशाच सोडल्या होत्या. पण, सूर्यकुमार यादव व अक्षर पटेल यांनी वातावरणात प्राण फुंकले अन् त्यांच्या फटकेबाजीने स्टेडियम जीवंत झाले.

सूर्यकुमार ३६ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकार खेचून ५१ धावांवर झेलबाद झाला. या दोघांची ९१ धावांची भागीदारी सहाव्या किंवा त्याखालील क्रमांकावरील ट्वेंटी-२०तील भारताकडून ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. हार्दिकने १७व्या षटकानंतर ब्रेक दरम्यान वॉशिंग्टन सुंदरकडून शिवम मावी व अक्षर साठी मेसेज पाठवला अन् पुढच्याच षटकात मावीने ६, ४, ६ अशी फटकेबाजी केली.

६ चेंडू २१ धावा असा सामना चुरशीचा आला. अक्षर ३१ चेंडूंत ३ चौकार व ६ षटकारांसह ६५ धावांवर बाद झाला अन् भारताचा पराभव पक्का झाला. भारताला ८ बाद १९० धावा करता आल्या आणि श्रीलंकेने १६ धावांनी सामना जिंकला. मावी १५ चेंडूंत २६ धावा करून बाद झाला.

हार्दिक पांड्या म्हणाला, पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी व फलंदाजीतील चुका महागात पडल्या. काही चुका तर बालीश होत्या. या स्तरावर त्या होणे अपेक्षित नाही. प्रत्येकाला माहित्येय त्या कोणत्या चुका होत्या. या सामन्यातून आम्हाला बरंच काही शिकता आलं. येणारा दिवस हा चांगला किंवा वाईट असू शकतो, परंतु तुम्हाला पुढे जात राहायला हवं.

अर्शदीपबाबत म्हणालयचं तर ही परिस्थिती कोणासाठीही आव्हानात्मक असली. त्याच्यावर टीका करायची नाही किंवा रागवायचे नाही, परंतु या फॉरमॅटमध्ये नो बॉल म्हणजे गुऩ्हाच आहे. राहुल त्रिपाठीला तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्यामागे हेतू हा होता की त्याला पहिल्याच सामन्यात त्याच्या आवडीच्या क्रमांकावर खेळवले तर तो सहज खेळेल.