डिसेंबर २०१२मध्ये भारताने इंग्लंडविरुद्ध मालिका गमावली होती आणि त्यानंतर घरच्या मैदानावर सलग १५ कसोटी मालिका विजय आहे. आतापर्यंत एकाही देशाला घरच्या मैदानावर १०पेक्षा अधिक कसोटी मालिका सलग जिंकता आलेल्या नाहीत.
या सामन्यात जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) दोन्ही डावात ( ५-२४ व ३-२३ ) मिळून ८ विकेट्स घेतल्या. दोन्ही डावांत अर्धशतकी खेळी करणाऱ्या मॅन ऑफ दी मॅच, तर रिषभ पंतला मॅन ऑफ दी सीरिज हा पुरस्कार देण्यात आला.
डे नाईट कसोटीतील हा तिसरा सर्वात मोठा विजय ठरला. यापूर्वी 296 - Aus v NZ, Perth, 2019 आणि 275 - Aus v Eng, Adelaide, 2021 यांनी अशी कामगिरी केली आहे.
भारताच्या पहिल्या डावातील २५२ धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेचा पहिला डाव १०९ धावांवर गडगडला. भारताने दुसरा डाव ९ बाद ३०३ धावांवर घोषित केला. ४४७ धावांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन मैदानावर उतरलेल्या श्रीलंकेने चौथ्या डावात चांगला खेळ केला.
कर्णधार दिमुथ करुणारत्नेच्या शतकी खेळीने त्यांचे मनोबल उंचावले, परंतु भारतीय गोलंदाजांसमोर ते फार काही करू शकले नाही. करुणारत्नेने कसोटीतील १४ वे शतक पूर्ण केले. २०१८ पासून कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून दिमुथ करुणारत्नेने सर्वाधिक २४४८ धावा केल्या आहेत.
दिवस-रात्र कसोटीच्या चौथ्या डावात शतक झळकावणारा करुणारत्ने हा पहिला सलामीवीर आणि पहिला कर्णधार ठरला आहे. १७४ चेंडूंत १५ चौकारांसह १०७ धावा करणारा करुणारत्ने त्रिफळाचीत झाला. यानंतर भारताला डाव गुंडाळण्यात फार कष्ट घ्यावे लागले नाही.
भारताचा हा श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर सलग चौथा कसोटी मालिका विजय आहे. प्रथमच भारताने अशी कामगिरी केली आहे. त्यांनी २००५ (२-०), २००९ ( २-०), २०१७ ( १-०) आणि २०२२ ( २-०) अशा चार मालिका जिंकल्या आहेत. यापूर्वी भारताने १९८६ ते १९९४ या कालावधीत सलग तीन कसोटी मालिका जिंकल्या होत्या.
कर्णधार म्हणून पहिले दोन कसोटी सामने जिंकणारा रोहित शर्मा हा भारताचा पाचवा कर्णधार ठरला. यापूर्वी सचिन तेंडुलकर ( १९९६), सौरव गांगुली ( २०००), महेंद्रसिंग धोनी ( २००८), अजिंक्य रहाणे ( २०१७-१८) यांनी हा पराक्रम केला आहे.
कसोटी कर्णधार म्हणून पदार्पणात प्रतिस्पर्धींना व्हाईट वॉश देणारा रोहित हा पहिला भारतीय कर्णधार ठरला. या ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्माने जेतेपदाची ट्रॉफी प्रियांक पांचालकडे सोपवली आणि परंपरा कायम राखताना स्वतः दूर जाऊन उभा राहिला.
या विजयासोबतच भारतीय संघानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर मुसंडी मारली आहे.