विराट कोहलीलाही शतकाचा दुष्काळ संपवता आला नाही. पण, रिषभ पंतने ( Rishabh Pant) विश्वविक्रमी कामगिरी केली. त्याने ४० वर्षांपूर्वी कपिल देव यांनी नोंदवलेला विक्रम मोडला. मात्र, श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) पून्हा हिट ठरला.
जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) पाच विकेट्स घेत भारत-श्रीलंका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पाहुण्यांचा पहिला डाव १०९ धावांवर गुंडाळला. जसप्रीतने २४ धावांत ५ विकेट्स घेतल्या. अश्विन व मोहम्मद शमीने दोन आणि अक्षरने एक विकेट घेतली.
भारताने दुसऱ्या डावात मयांक ( २२) व रोहित ( ४६) यांनी पहिल्या विकेटसाठी ४२ धावा रोहित व विहारी यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११९ चेंडूंत ५६ धावा जोडल्या. विहारीही ३५ धावांवर त्रिफळाचीत झाला.
विराट १३ धावांवर माघारी परतल्यानंतर रिषभ पंतने तुफान फटकेबाजी केली. त्याने २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना ७ चौकार व २ षटकार खेचले. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम रिषभच्या नावावर नोंदवला गेला आहे. हा विक्रम मागील ४० वर्षे कपिल देव यांच्या नावावर होता.
रिषभ ३१ चेंडूंत ५० धावा करून बाद झाला. त्यानंतर रवींद्र जडेजा व फॉर्मात असलेल्या श्रेयस अय्यर यांनी १०१ धावांत ६३ धावांची भागीदारी केली. पहिल्या डावात ९२ धावा करणाऱ्या श्रेयसने अर्धशतक झळकावून विक्रमाला गवसणी घातली. दिवस रात्र कसोटीच्या दोन्ही डावांत अर्धशतक झळकावणारा श्रेयस हा पहिला भारतीय व जगातला चौथा खेळाडू ठरला.
दिवस-रात्र कसोटीच्या ( Pink Ball Test) दोन्ही डावांत अर्धशतक झळकावणारा श्रेयस अय्यर हा चौथा फलंदाज ठरला. याआधी डॅरेन ब्राव्हो ८७ व ११६ ( वि. पाकिस्तान, दुबई, २०१६), स्टीव्ह स्मिथ १३० व ६३ ( वि. पाकिस्तान, ब्रिस्बेन, २०१६), मार्नस लाबुशेन १४३ व ५० ( वि. न्यूझीलंड, पर्थ, २०१९), मार्नस लाबुशेन १०३ व ५१ ( वि. इंग्लंड, एडलेड, २०२१) यांनी अशी कामगिरी केली आहे.