IND vs WI, 2nd ODI : WORLD RECORD! भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर मात केली, परंतु पाकिस्तानची जीरवली; मोडला त्यांचा विश्वविक्रम

India vs West Indies 2nd ODI : भारत-वेस्ट इंडिज मालिकेतील पहिले दोन्ही सामना रोमहर्षक झाले. पहिल्या सामन्यात रोमारिओ शेफर्डला विजयी षटकार खेचता आला नाही, परंतु दुसऱ्या सामन्यात भारताच्या अक्षर पटेलने ( Axar Patel) हा शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलला..

India vs West Indies 2nd ODI : भारत-वेस्ट इंडिज मालिकेतील पहिले दोन्ही सामना रोमहर्षक झाले. पहिल्या सामन्यात रोमारिओ शेफर्डला विजयी षटकार खेचता आला नाही, परंतु दुसऱ्या सामन्यात भारताच्या अक्षर पटेलने ( Axar Patel) हा शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलला.. ३ चेंडूंत ६ धावांची गरज असताना त्याने खणखणीत षटकार खेचून २ विकेट्स राखून भारताला विजय मिळवून दिला आणि मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.

शे होप ( ११७), कर्णधार निकोलस पूरन ( ७४), कायले मेयर्स ( ३९) व शामार्ह ब्रुक्स ( ३५) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने ६ बाद ३११ धावांचा डोंगर उभा केला. पदार्पणवीर आवेश खानची ( ६ षटकांत ५४ धावा) याची चांगली धुलाई झाली. शार्दूल ठाकूरही ( ७ षटकांत ५४ धाव) महागडा ठरला, परंतु त्याने तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. दीपक हुडा, अक्षर पटेल व युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी विकेट घेतली.

लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवन ( १३) व शुबमन गिल ( ४३) यांनी फार संथ सुरुवात केली. त्यात सूर्यकुमार यादवही (९) अपयशी ठरल्यानं भारताची अवस्था ३ बाद ७९ अशी झाली. यावेळेस संजू सॅमसन व श्रेयस अय्यर ही जोडी मैदानावर अडून बसली आणि त्यांनी चौथ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली.

श्रेयस अय्यर ६३ आणि संजू ५४ धावांवर माघारी परतल्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ पुनरागमन करताना दिसला. पण, दीपक हुडा व अक्षर पटेल यांनी अर्धशतकी भागीदारी करून पुन्हा गाडी रुळावर आणली. दीपक ३३ धावांवर बाद झाला.

अक्षर पटेलने ३५ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने नाबाद ६४ धावांची खेळी केली. विजयासाठी ६ धावांची गरज असताना त्याने मिड ऑनच्या दिशेने खणखणीत षटकार खेचला अन् भारताने २-० अशी विजयी आघाडी घेतली. विराट कोहली ( दोनवेळा), महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, सुरेश रैना यांच्यानंतर शिखर धवन हा विंडीजमध्ये वन डे मालिका जिंकणारा भारतीय कर्णधार ठरला.

भारताचा हा विंडीजविरुद्ध सलग १२ वा वन डे मालिकेतील विजय ठरला. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. २००६ मध्ये विंडीजने ब्रायन लाराच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला वन डे मालिकेत अखेरचे पराभूत केले होते. मजेशीर बाब म्हणजे सध्याचे भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे २००६ मधील १-४ अशा पराभवाच्या वेळी टीम इंडियाचे कर्णधार होते.

भारताने पाकिस्तानचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. त्यांनी झिम्बाब्वेविरुद्ध सलग ११ वन डे मालिका जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. बुधवारी मालिकेतील शेवटची वन डे होणार आहे आणि त्यात व्हाईट वॉश देण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.