Join us  

रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! यशस्वी जैस्वालसह केला ९१ वर्षांच्या कसोटी इतिहासात न घडलेला पराक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 9:54 PM

Open in App
1 / 8

India vs West Indies 2nd Test Live Marathi : भारताच्या सलामीच्या जोडीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली. पोर्ट ऑफ स्पेन येथे दुसऱ्या डावात रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी तुफानी फलंदाजी करत ५.३ षटकांत ५० धावा जोडल्या. भारताच्या कसोटी इतिहासातील पहिल्या विकेटसाठी ही सर्वात वेगवान ५० धावांची भागीदारी ठरली.

2 / 8

भारत १९३२ मध्ये पहिल्यांदा कसोटी खेळला आणि तेव्हापासून सहाव्या षटकातच ५० धावा फलकावर टांगल्या गेल्या नव्हत्या. दुसऱ्या कसोटीत मोहम्मद सिराजच्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजला २५५ धावांत गुंडाळले. शेवटच्या पाच विकेट २६ धावांत पडल्या आणि भारताने १८३ धावांची आघाडी घेतली.

3 / 8

दुसऱ्या डावात रोहित आणि यशस्वी यांनी आक्रमक सुरूवात केली. पहिल्याच षटकात १ षटकार आणि १ चौकार मारून यशस्वीने इरादे स्पष्ट केले. पुढच्याच षटकात रोहितने चौकार लगावला. त्यानंतर तिसऱ्या षटकात त्याने षटकार मारला. अल्झारी जोसेफला चौकार ठोकल्यानंतर पुढच्याच षटकात त्याने षटकार ठोकला. जैस्वालने पाचव्या षटकात जेसन होल्डरला चौकार मारला. त्यानंतर पुढच्या षटकाच्या तिसर्‍या चेंडूवर सिंगल घेताच ५०धावा पूर्ण झाल्या.

4 / 8

रोहित शर्माने ३५ चेंडूंत आज अर्धशतक पूर्ण केले आणि कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय सलामीवीराकडून हे तिसरे वेगवान अर्धशतक ठरले. या विक्रमात वीरेंद्र सेहवाग पहिल्या दोन क्रमांकावर आहे. त्याने २००८ मध्ये इंग्लंडविरुद्ध ( चेन्नई) ३२ चेंडूंत आणि २००६ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ( ग्रॉस इस्लेट) ३३ चेंडूंत अर्धशतक झळकावले होते.

5 / 8

रोहितने आजच्या सामन्यात वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली. कसोटी क्रिकेटमध्ये सलग ३० वेळा दुहेरी धावसंख्या करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला. त्याने २०२१-२३ या कालावधीत ३० वेळा हा पराक्रम करताना माहेला जयवर्धनेचा ( २००१-०२) २९ इनिंग्जचा विक्रम मोडला.

6 / 8

रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल यांनी या मालिकेत ४६६ धावां जोडल्या आणि भारताकडून कसोटी मालिकेतील ही तिसरी सर्वोत्तम धावांची सलामीवीरांची भागीदारी ठरली. सुनील गावस्कर व चेतन चौहान यांनी १९७९/८०च्या मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५३७ धावा जोडल्या होत्या. वीरेंद्र सेहवाग व गौतम गंभीर यांनी २००५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ४७७ धावा केलेल्या.

7 / 8

आशिया खंडाबाहेर कसोटी क्रिकेटमध्ये दोन्ही डावांत भारतीय सलामीवीराने ५०+ धावा करण्याची ही तिसरी वेळ ठरली. रोहित शर्माने विंडीजविरुद्ध ८० व ५७ धावा केल्या. यापूर्वी मुरली विजयने २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एडिलेड कसोटीत ५३ व ९९ आणि इंग्लंडविरुद्ध नॉटिंगहॅममध्ये १४६ व ५२ धावा केल्या होत्या.

8 / 8

रोहित व यशस्वी यांनी ४६६ धावा जोडल्या आणि २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील सलामीवीरांची ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. ग्रॅमी स्मिथ व निल मॅकेंझी यांनी ४७९ धावा ( वि. बांगलादेश, २००८) आणि डीन एल्गर व एडन मार्कराम यांनी ४६९ धावा ( वि. बांगलादेश, २०१७) हे आघाडीवर आहेत.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्मायशस्वी जैस्वाल
Open in App