आयपीएलचा सोळावा हंगाम काही भारतीय युवा खेळाडूंना एक नवीन ओळख देऊन गेला. रिंकू सिंग, शुबमन गिल आणि आकाश मधवाल यांसारख्या युवा खेळाडूंनी आयपीएल २०२३ गाजवली. गिलने तर ऑरेंज कॅप पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली.
गुजरात टायटन्सकडून खेळताना आयपीएल २०२३ मध्ये ८५१ धावा केल्यानंतर गिल प्रसिद्धीच्या झोतात आला. पण, त्यानंतर गिलची बॅट शांत झाल्याचे दिसते. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील गिलला मोठी खेळी करण्यात अपयश आले.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या अंतिम सामन्यात गिलने पहिल्या आणि दुसऱ्या डावात अनुक्रमे (१३) आणि (१८) धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजविरूद्धच्या कसोटी मालिकेत देखील गिलला साजेशी कामगिरी करता आली नाही.
दरम्यान, शुबमन गिलच्या खराब फॉर्मबद्दल बोलताना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी गिलची पाठराखण केली. गिलच्या फलंदाजीची मला काळजी नसून तो चांगल्या प्रकारे कामगिरी करतो आहे, असे द्रविड यांनी म्हटले. वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
'प्रत्येक सामन्यानंतर तुम्ही खेळाडूवर टीका करू शकत नाही. या गोष्टी घडतच असतात याची सर्वांना कल्पना आहे. येथील खेळपट्टीवर फलंदाजी करणे कठीण आहे', असे द्रविड यांनी म्हटले.
शुबमन चांगली फलंदाजी करत आहे आणि तो आमच्यासाठी तिन्ही फॉरमॅटचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे आशा आहे की, त्रिनिनादमध्ये तो चांगला खेळ करेल, असेही द्रविड यांनी नमूद केले.
खरं तर वेस्ट इंडिजविरूद्धच्या वन डे मालिकेत विजयी सलामी दिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. नवीन कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात होती. पण, यजमान संघाने मोठा विजय मिळवत पाहुण्या भारतीय संघाला पराभवाची धूळ चारली.
गुरूवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवून विजयी सलामी दिली होती. पण, शनिवारी झालेला सामना जिंकून यजमान संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
दुसऱ्या वन डेत वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यजमान संघाने सांघिक खेळी करत भारताला ४०.५ षटकांत १८१ धावांवर सर्वबाद केले. १८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विडिंजने ३६.४ षटकांत ४ बाद १८२ धावा करून विजय साकारला.
त्यामुळे मालिकेतील अखेरचा वन डे सामना निर्णायक असणार आहे. हा सामना त्रिनिदाद येथे ब्रायन लारा क्रिकेट अकादमी या मैदानावर बुधवारी होईल.