संजू सॅमसनला बाकावर बसवून ठेवणार? रोहित शर्मा वन डे मालिकेत ही प्लेइंग इलेव्हन उतरवणार

IND vs WI Series : भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी जाहीर केलेल्या वन डे संघात संजू सॅमसनचे नाव पाहून सर्वांना आनंद झाला, परंतु तीन सामन्यांच्या या मालिकेत रोहित शर्मा त्याला बाकावरच बसवून ठेवण्याची शक्यता अधिक दिसतेय.

भारतीय संघ कॅरेबियन बेटावर पोहोचला आहे आणि १२ जुलैपासून पहिल्या कसोटीला सुरुवात होणार आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर भारतीय संघ तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. रिषभ पंतच्या अनुपस्थितीत इशान किशन व संजू सॅमसन यांना संधी आहे. पण, रोहित प्लेइंग इलेव्हनमध्ये इशानला खेळवण्याची शक्यता अधिक आहे.

सलामीला रोहित शर्मा व शुबमन गिल ही जोडी दिसेल हे निश्चित आहे. रोहितचा फॉर्म काही खास नसला तरी वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी त्याला पुन्हा फॉर्म परत मिळवण्याची ही नामी संधी आहे. शुबमनने तिन्ही फॉरमॅटमध्ये वर्चस्व गाजवायला सुरूवात केली आहेच.

मधल्या फळीत विराट कोहली आहेच, त्याच्यापाठोपाठ सूर्यकुमार यादव हा चौथ्या क्रमांकासाठी आहे. पाचव्या क्रमांकासाठी इशान किशन व संजू सॅमसन यांच्यात चढाओढ आहे. लोकेश राहुल जर तंदुरुस्त झाला असता तर या दोघांनाही संधी मिळाली नसती.

रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या व शार्दूल ठाकूर असे अष्टपैलू संघासोबत आहेत. त्यातही अक्षर पटेल याला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळू शकते. गोलंदाजी विभागात मोहम्मद सिराज, शार्दूल व जयदेव उनाडकट असे जलदगती गोलंदाज संघात आहेत.

अशी असेल प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, इशान किशन, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज व जयदेव उनाडकट