IND vs ZIM : कमी पाण्यात आंघोळ करा, स्विमिंग पूलचा वापर करू नका!; भारतीय खेळाडूंना BCCI ची सक्त ताकीद

India vs Zimbabwe : भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या वन डे मालिकेला १८ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. लोकेश राहुल तंदुरुस्त झाल्यामुळे शिखर धवनकडून कर्णधारपदाची जबाबदारी काढून घेतली गेली आहे.

India vs Zimbabwe : भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या वन डे मालिकेला १८ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. लोकेश राहुल तंदुरुस्त झाल्यामुळे शिखर धवनकडून कर्णधारपदाची जबाबदारी काढून घेतली गेली आहे. त्यामुळे आता राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ही मालिका खेळणार आहे. व्ही व्ही एस लक्ष्मण या संघाचे कोच आहेत. या मालिकेतील सर्व सामने हरारे येथे होणार आहेत आणि BCCI ने भारतीय खेळाडूंना काही गोष्टींची ताकीद दिली आहे.

Harare Water Crisis : हरारे येथे सध्या पाण्याचा दुष्काळ आहे आणि त्यामुळे येथील नागरिकांना पाण्याच्या भीषण समस्येचा सामना करावा लागत आहेत. हरारेच्या काही भागांत तीन-तीन दिवस पाणीच येत नाही. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. त्यामुळे बीसीसीआयने लोकेश राहुल अँड कंपनीला पाणी जपून वापरण्याच्या सूचना केल्या आहेत.

२०१८च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही अशीच समस्या उद्भवली होती. केप टाऊन येथील बऱ्याच भागांत पाणी नव्हतं आणि त्याहीवेळेस बीसीसीआयने खेळाडूंना एका बादलीत आंघोळ करण्याच्या सूचना केल्या होत्या.

''हरारे येथे पाण्याची भीषण समस्या आहे आणि खेळाडूंना त्याबाबत कल्पना दिली गेली आहे. त्यांना कमी पाण्यात आंघोळ करण्यास सांगितले आहे. शिवाय स्विमिंग पूलचा वापर करण्यास मनाई केली गेली आहे,''असे BCCIच्या अधिकाऱ्याने सांगितले.

भारतीय संघाच्या निवड समितीने वॉशिंग्टन सुंदरच्या जागी फिरकीपटू शाहबाज अहमद याची निवड केली आहे. १८, २० व २२ असे तीन वन डे सामने हरारे येथे होणार आहेत. भारतीय संघ - लोकेश राहुल ( कर्णधार), शिखर धवन ( उप कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन ( यष्टिरक्षक), संजू सॅमसन ( यष्टिरक्षक), शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर, शाहबाज अहमद