WTC points table : टीम इंडियाच्या मदतीला धावला पाकिस्तानचा संघ; जाणून घ्या नेमकं काय केलं!

पाकिस्तानचा कसोटी संघ बुधवारी टीम इंडियाच्या मदतीला धावून आला.

पाकिस्तानचा कसोटी संघ बुधवारी टीम इंडियाच्या मदतीला धावून आला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला इंग्लंड-भारत यांच्यातल्या कसोटी मालिकेनं सुरूवात झाली. त्यानंतर पाकिस्तानचा संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी पोहोचला अन् मालिका १-१अशी बरोबरीत सोडवली.

दुसऱ्या कसोटीत पाकिस्ताननं फवाद आलम ( १२४*) व कर्णधार बाबर आजम ( ७५) यांच्या खेळीच्या जोरावर पहिला डाव ९ बाद ३०२ धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात विंडीजचा पहिला डाव १५० धावांवर गडगडला. शाहिन शाह आफ्रिदीनं ५१ धावांत ६ विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद अब्बासनं तीन विकेट्स घेतल्या.

पाकिस्ताननं दुसरा डाव ६ बाद १७६ धावांवर घोषित करून विंडीजसमोर ३२९ धावांचे लक्ष्य ठेवले. आफ्रिदीनं चार व हसन अलीनं तीन विकेट्स घेत विंडीजचा दुसरा डावही २१९ धावांवर गुंडाळून संघाला १०९ धावांनी विजय मिळवून दिला. पाकिस्ताननं ही मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली.

इंग्लंड दौऱ्यावर भारताला पहिला कसोटी सामना जिंकता आला असता, जर पावसानं खोडा घातला नसता. पण टीम इंडियानं लॉर्ड्स कसोटीत दणदणीत विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पहिली कसोटी अनिर्णित राहिल्यानं भारत-इंग्लंड यांना प्रत्येकी ४-४गुण दिले गेले, परंतु षटकांची मर्यादा कमी राखल्यानं दोघांच्या खात्यातील २-२ गुण वजाही केले.

याच दरम्यान वेस्ट इंडिजनं पहिल्या कसोटीत रोमहर्षक विजय मिळवून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत १२ गुणांसह अव्व्ल स्थानी झेप घेतली अन् टीम इंडियासह इंग्लंडला मागे ढकलले. पण, टीम इंडियानं लॉर्ड्स जिंकून १२ गुणांची कमाई केली व १४ गुणांसह अव्वल स्थानावर पुन्हा कब्जा केला.

टीम इंडियाचे हे अव्वल स्थान पाकिस्ताननं वाचवले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पाकिस्ताननं १०९ धावांनी विजय मिळवला अन् १२ गुणांची कमाई केली. त्यामुळे वेस्ट इंडिजची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली अन् पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर सरकला.

टीम इंडिया १४ गुण व ५८.३३ टक्क्यांच्या जोरावर अव्वल स्थानी कायम आहे आणि हेडिंग्ले कसोटी जिंकून खात्यात आणखी १२ गुण जमा करण्याची संधी टीम इंडियाकडे आहे.