World Test Championship 2023: टीम इंडिया जागतिक कसोटीची फायनल कशी गाठणार?; रोहित शर्मासमोर अशक्य आव्हान

World Test Championship 2023 Final - राहुल द्रविडने ( Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर भारताने परदेशात गमावलेली ही दुसरी मालिका आहे.

World Test Championship 2023 Final - राहुल द्रविडने ( Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर भारताने परदेशात गमावलेली ही दुसरी मालिका आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारताला सपाटून मार खावा लागला होता. त्यात इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत २-१ असे आघाडीवर असूनही टीम इंडियाला २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने मागील वर्षी इंग्लंड दौऱ्यावर २-१ अशी आघाडी घेतली होती, परंतु या मालिकेतील पाचव्या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारताला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे भारताचा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( World Test Championship 2023) फायनलमध्ये जाण्याचा मार्गही खडतर झाला आहे.

भारताच्या पहिल्या डावातील ४१६ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव २८४ धावांवर गडगडला. १३२ धावांची आघाडी मिळवूनही भारताला दुसऱ्या डावात साजेशी कामगिरी करता आली नाही. चेतेश्वर पुजारा ( ६६) व रिषभ पंत ( ५७) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने २४५ धावांपर्यंत मजल मारली आणि इंग्लंडसमोर ३७८ धावांचे लक्ष्य ठेवण्यात ते यशस्वी झाले.

जॅक क्रॅवली ( ४६) व अॅलेक्स लीज ( ५६) यांनी पहिल्या विकेटसाठी १०७ धावा जोडल्या अन् मजबूत पाया रचला. त्यानंतर भारताने २ धावांच्या अंतराने तीन विकेट्स घेत कमबॅक केले. पण, जो रूट ( १४२*) व जॉनी बेअरस्टो ( ११४*) यांनी सर्व गणित बिघडवले. त्यांनी भारतीय गोलंदाजांचा पालापाचोळा केला. या दोघांनी ३१६ चेंडूंत २६९ धावांची नाबाद भागीदारी करताना ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

या पराभवानंतर भारतीय संघ ७७ गुणांसह WTC 23 Point Table मध्ये तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. इंग्लंडने ६४ गुणांसह सातव्या स्थानावर कूच केली आहे. ऑस्ट्रेलिया ८४ गुण व ७७.७८ टक्क्यांसह अव्वल, तर दक्षिण आफ्रिका ६० गुण व ७१.४३ टक्क्यांसह अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील कसोटी मालिका गमावणेही भारताला महागात पडले आहे. आफ्रिकेविरुद्ध भारताला २४० व २१२ धावांचा यशस्वी बचाव करता आला नाही. इंग्लंडविरुद्ध तर चौथ्या डावात भारताने ३७८ धावा दिल्या.

- २ कसोटी वि. बांगलादेश ( दौरा) आणि ४ कसोटी वि. ऑस्ट्रेलिया ( घरच्या मैदानावर); आता भारताला बांगलादेश दौऱ्यावरील दोन्ही कसोटी व मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चारही कसोटी जिंकाव्या लागतील, तर आणि तरच ते जागतिक कसोटीच्या अंतिम फेरीत प्रवेश करू शकणार आहेत.