IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात रोहित सेनेचा पराभव; पण 'या' भारतीय खेळाडूंनी केले नवीन विक्रम

सध्या आशिया चषकाचा थरार रंगला असून भारतीय संघाला स्पर्धेतील आपल्या तिसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

आशिया चषकाच्या सुपर-4 मधील दुसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान आमनेसामने होते. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात पाकिस्तानने 5 गडी आणि 1 चेंडू राखून विजय मिळवला. भारतीय संघाने सामना जरी गमावला असला तरी संघातील काही खेळाडूंनी आपल्या शानदार खेळीने नवे विक्रम तयार केले आहेत.

विराट कोहली मोठ्या कालावधीनंतर त्याच्या जुन्या लयनुसार खेळत आहे. आशिया चषकातील तिन्ही सामन्यात किंग कोहलीने साजेशी खेळी करून सर्वांचे लक्ष वेधले. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात कोहलीच्या वैयक्तिक 60 धावांमुळे भारताने मोठी धावसंख्या उभारली होती. या अर्धशतकी खेळीसोबत किंग कोहलीने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये आपले 32 वे अर्धशतक झळकावले आहे. सध्या टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके करणारा तो पहिला फलंदाज आहे. याआधी हा विशेष विक्रम रोहित शर्माच्या (31) च्या नावावर होता.

आशिया चषकामध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत रोहित शर्माने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले आहे. एवढेच नाही तर आशिया चषकामध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार मारणारा तो पहिला भारतीय कर्णधार बनला आहे. रोहितच्या नावावर आतापर्यंत 18 षटकारांची नोंद आहे. तर धोनीने 16 षटकार ठोकले आहेत. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माने 2 षटकार ठोकले होते.

रोहित शर्माने आशिया चषकात सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या यादीत श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याला मागे टाकले आहे. जयसूर्याने या बहुचर्चित स्पर्धेत एकूण 23 षटकार मारले आहेत. तर रोहित शर्माने आतापर्यंत एकूण 25 षटकार ठोकले आहेत. मात्र या यादीत पहिल्या स्थानावर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी विराजमान आहे. त्याने एकूण 26 षटकार मारले आहेत.

रविवारी पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाने पहिल्या पॉवरप्लेमध्ये एक बळी गमावून एकूण 62 धावा केल्या होत्या. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध पॉवरप्लेमध्ये भारताची ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे.

याशिवाय अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहलने टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी पटकावण्याच्या बाबतीत जॉर्ज डॉकरेलची बरोबरी साधली आहे. या दोन्ही खेळाडूंनी टी-20 मध्ये प्रत्येकी 80-80 बळी घेतले आहेत.

टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत भारतीय सलामीवीर के.एल राहुलने आफ्रिकेचा फलंदाज क्विंटन डी कॉक आणि श्रीलंकेचा माजी सलामीवीर तिलकरत्ने दिलशान यांना मागे टाकले आहे. राहुलच्या नावावर आतापर्यंत टी-20 क्रिकेटमध्ये 1,895 धावांची नोंद आहे. तर डी कॉकने 1,894 आणि दिलशानने 1,889 धावा केल्या आहेत.